इटलीतून मुलीची मुक्तता करणारे नरेंद्र मोदी पित्यासमान

जनदूत टिम    18-Mar-2020
Total Views |
नवी दिल्ली : परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यापासून ते मायदेशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करत त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देईपर्यंत भारत सरकारने परिस्थिती चांगली हाताळली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान इटलीमधील मिलान शहरात अडकलेल्या भारतीय मुलीच्या वडिलांनी आपली भावनिक प्रतिक्रिया शेअर केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीची इटलीतून मुक्तता करणारे नरेंद्र मोदी पित्यासमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुलीचे वडील सुजय कदम यांनी सगळा घटनाक्रम सांगत भारतीय सरकारच्या कामगिरीची स्तुती केली आहे. सुजय कदम हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांची मुलगी उच्चशिक्षणासाठी ४ फेब्रुवारीला इटलीत गेली होती. पण करोनाचा उद्रेक झाल्याने कॉलेज बंद करण्यात आलं. भारतीय दुतावासाने असा परिस्थितीत तात्काळ उत्तर दिल्याने आपण आश्चर्यचकित झाल्याचं ते सांगतात.
 
modi_1  H x W:
 
“२८ फेब्रवारीला तिने मला सगळं काही ठीक असल्याचं सांगितलं. तिने चार महिन्यांसाठी घर भाड्याने घेतलं होतं. पण १० मार्चला शहरात सगळं काही बंद करण्यात आलं होतं,” असं सुजय कदम सांगतात. थोड्याच दिवसात लॉक डाऊन करण्यात आल्याने परिस्थिती अजून बिघडली होती. सुजय कदम यांनी आपल्या मुलीला भारतात परतण्यास सांगितलं. दुसरीकडे इटली सरकार भारतात परतण्यासाठी ओळख पटवून देण्यास सांगत होतं.
 
चिंतेत असणाऱ्या सुजय कदम यांनी १२ मार्च २०२० रोजी भारतीय दुतावासाला मेल पाठवला. यावर लगेच उत्तर नाही असं त्यांना वाटत होतं. पण १३ मार्चला त्यांनी भारतीय दुतावासाकडून फोन आला. यावेळी तुमची मुलगी १४ मार्च रोजी भारतात परतण्यासाठी निघणार असल्याचं सांगताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सुजय कदम यांनी याबद्दल मोदी सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ते सांगतात मी आधी मोदी सरकारवर टीका करायचो. पण खरंच भारतीय सरकारने एका वडिलांप्रमाणे आपलं कर्तव्य निभावलं आहे. १५ मार्च रोजी सुजय कदम यांची मुलगी भारतात परतली. यानंतर तिला आयटीबीपी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. एखादे पालक आपल्या मुलांची काळजी घेतात अगदी त्याप्रमाणे सरकारने रुग्णांच्या औषध, जेवणाची सोय केली होती असं ते सांगतात.
 
सुजय कदम यांनी भारतीय दुतावास, एअर इंडिया आणि आयटीबीपी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. “मला आधी वाटायचं फक्त मीच माझ्या मुलीचा वडील आहे. पण आता मोदी सरकारही तिला वडिलांप्रमाणे आहे. पंतप्रधानांचे आभार…,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी परदेशात मुलं अडकलेल्या पालकांना घाबरु नका, भारतीय दुतावास योग्य काळजी घेत असल्याचं म्हटलं आहे.