पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू बाबाचा पर्दापाश

शरद पाटिल    18-Mar-2020
Total Views |
' दुनिया झुकती है, सिर्फ झुकानेवाला चाहिए ' हा डायलॉग सर्वांनाच माहिती आहे. तसाच ' बेकुब एक ढुंढने निकलो, हजार मिलते है ' हा संवादही फेमस आहे. हे दोन्ही गाजलेले शेर मोखाडा या अतिदुर्गम व डोंगराळ तालुक्यातील एका छोट्याशा खेडे गावातील भोंदू बाबाने अक्षरशः खरे ठरवले आहेत. एका अडाणी, अशिक्षीत व खेडवळ माणसाने करोडोंचा बनवा-बनवीचा खेळ खेळला आहे आणि या खेळामध्ये बडे-बडे असामी त्याने सहज गंडवले आहेत. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. मोठ-मोठ्या पदांवरील शासकीय अधिकारी आहेत. तर काही धनाढ्य असामीही आहेत. विशेष म्हणजे त्याच्या या पैशांचा पाऊस पाडण्याच्या खेळामध्ये काही ' लोभी ' पोलीसही सामील झाल्याने व त्याला राजकीय पाठबळ मिळाल्याने हा खेळ मोखाडा तालुक्यातील कुर्लोद या छोट्याशा गावातील माणेपाड्यावर राजरोस रंगतो आहे.
 
Dhongi Babab_1  
 
भोंदूबाबाच्या या खेळाची सर्वांनाच माहीती आहे. फक्त राजकीय वरदहस्तामुळे त्याची वाच्यता होत नव्हती. सर्वकाही बिनबोभाट सुरू होते. मात्र कुठलेही वाईट कृत्य फारकाळ चालत नाही. कधीना-कधी पापाचा घडा भरतोच तसाच पापाचा घडा या बाबाचा भरला आहे म्हणूनच ' पैशांच्या पावसाचे ' हे प्रकरण उघडकीस येण्याची ' शक्यता ' निर्माण झाली आहे. शक्यता यासाठी की , पोलीसांना सर्वकाही माहीती असूनही किंबहुना दि. ४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास वाडा तालुक्यातील आखाडा गावामध्ये पोलीसांना आरोपींकडून मिळालेल्या खोट्या नोटा जप्त केल्यानंतर प्रकरण उघडकीस येऊनही या भोंदूबाबावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. यापुढेही होईल याची फारशी शक्यताही नाही मात्र आमच्या या एका लेखाने या भोंदूबाबांच्या कृत्याचा पर्दापाश होईल व त्यामुळे जनजागृती होऊन जनता सावध होईल आणि हा राजरोस लुटमारीचा बोगस धंदा बंद होईल हाच या शोधपत्रकारीतेमागचा प्रामाणिक उद्देश.
 
आम्हाला आमच्या सुत्रांकडून वाडा तालुक्यातील आखाडा गावातील बरफपाडा येथून दि. ४ मार्च रोजी पोलीसांनी कोट्यावधी रुपयांच्या २००० रुपयांच्या खोट्या नोटा व आरोपी पकडल्याची माहीती मिळाली होती. या माहीतीनुसार तपास सुरू करताच लक्षात आले की, या खोट्या नोटांची तक्रार कुठल्याच पोलीस ठाण्यामध्ये झालेली नाही. प्रकरण परस्पर दाबले गेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची उत्सुकता अधिकच वाढली. अधिक शोध घेतला असता माहीती मिळाली की, वाडा शहरातील ५ तरुणांनीच या भोंदूबाबाच्या घरावर दरोडा टाकला होता. या दरोड्यामध्ये या खोट्या नोटा मिळाल्या होत्या आणि त्या नोटा पोलीसांनी जप्त केल्या आहेत. मग आम्ही आरोपींशी संबंधीत असलेल्या नातेवाईकांशी चर्चा केली त्यावेळी समजले की , या कोट्यावधी रुपयांच्या बोगस नोटांची चर्चा सर्वदूर सुरू आहे. वाडा, जव्हार, मोखाडा व विक्रमगड या चारही तालुक्यांमध्ये दबक्या आवाजामध्ये २००० च्या खोट्या नोटांचे प्रकरण चर्चिले जात आहे. मात्र उघड कुणीही बोलायला तयार नाही. म्हणूनच आम्ही आखाडा गावातील काही ओळखीच्या माणसांशी संपर्क साधला. ज्या गावी ही दरोड्याची घटना घडली होती त्या कुर्लोद गावातील काहींशी चर्चा केली तर प्रकरण थेट भोंदूबाबापर्यंत पोहोचले. भोंदूबाबाच्या पैशांचा पाऊस पाडण्याची करामत ऐकून तर अक्षरशः हैराणच झालो. आणि मग ठरवलं की या प्रकरणाचा 'सोक्ष-मोक्ष' लावायचाच.
 
शुक्रवार दि. १३ मार्च रोजी कुंबीस्ते, आखाडा व कुर्लोद या गावातील काही माणसं आम्हाला भेटायला आली. त्यांनी माहीती दिली. पण ती माहीती ' रचलेल्या कहाणींवर' आधारीत व कपोल-कल्पीत अशी वाटत होती. कुणी म्हणत होतं की आखाडा गावातील मनोहर गुण्या बरफ याच्या घरातुन पोलीसांनी कोट्यावधी रुपयांच्या खोट्या नोटा जप्त केल्या तर कुणी म्हणत होतं की, त्या २ कोटी रुपयांच्या खऱ्या नोटा होत्या पण पोलीसांनी त्या खोट्या आहेत असे सांगून लंपास केल्या आहेत. तर काहींचं म्हणणं होतं की, पोलिसांनी २००० रुपयांच्या नोटांची ८० बंडलं ताब्यात घेतली होती. प्रत्येकजण वेगवेगळी माहिती सांगून पोलिसांविषयी संभ्रह निर्माण करत होता. म्हणूनच आम्ही स्वतः त्या गावांमध्ये जाण्याचं ठरवून आलेल्या सर्वांना सोबत घेतलं, बरोबर ' मशाल न्यूज नेटवर्क ' चे कॅमेरामॅन सुधीर दुरगुडे व पत्रकार शुभम पाटील यांनाही घेतलं आणि आखाडा गाव गाठलं.
वाडा तालुक्यातील आखाडा हे वाडा तालुक्याचे शेवटचे टोक. डोंगर-दऱ्यात वसलेलं आणि १०० टक्के आदिवासी लोकवस्तीचं हे गाव. ' मशाल स्टुडिओ ' पासून ४५ किलोमीटर अंतर पार करून गेल्यानंतर आखाडा गावामध्ये पोहोचलो. तेथे पोहोचल्यानंतर सोबतच्या ग्रामस्थांनी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष शंकर मालक यांना बरोबर घेतले. हे शंकर मालक पोलिसांनी पैसे जप्त केले त्यावेळी तेथे हजर होते. त्यांनी माहिती दिली की , पहाटे ४ वाजेच्या सुमारास पोलीस आखाडा गावामध्ये आले व मला घेऊन मनोहर बरफ यांच्या घरी नेले. पोलिसांबरोबर आरोपी लक्ष्मण दामु बरफ हा होता. त्याने पैसे ठेवल्याची पिशवी काढून दिली. ती पिशवी सिमेंटच्या पिशवी एवढी मोठी होती व त्यामध्ये २००० च्या नोटा होत्या. ही माहिती घेऊन त्यांना बरोबर घेतले व आखाडा गावापासून दूर अंतरावर असलेल्या बरफपाडा गावाकडे जायला निघालो. काही अंतर गेल्यानंतर रस्ता संपला. पुढे इनोव्हा गाडी जायला रस्ताच नव्हता. मग सोबत असलेल्या जयेंद्र् बरफ याच्या टु व्हिलरवर बसून प्रवास केला व जेथे रस्ता नाही, लाईट नाही वा कुठल्याच सुविधा आजपर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्या बरफपाड्यातील मनोहर बरफ यांच्या घरी पोहोचलो. तेथे असलेल्या हनुमंत बरफ, शंकर बरफ व अन्य उपस्थितांनी पैशांची पिशवी असलेली जागा दाखवली. पोलिसांनी ज्या घरामधून हे पैसे जप्त केले तेथील व्यक्तींबरोबर चर्चा केली. त्यांच्या मुलाखती घेतल्या. तेथेच आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सुभाष गावित हे भेटले. त्यांनी अधिक माहिती पुरवली व ' बरफपाड्यातुन जमा केलेले पैसे गेले कुठे? असा प्रश्न विचारला. पोलिसांनी पैसे जप्त केले त्यावेळी घटनास्थळी हजर असलेल्या शंकर मालक यांनी हे पोलीस ' पालघर क्राईम ' चे होते असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी याच घरावर धाड टाकुन पैसे कसे जमा केले, याचा इतिहास सांगितला. त्यावेळी कळले की, हे पैसे आखाडा गावापासून काही अंतरावर असलेल्या कुर्लोद गावातील भोंदूबाबाच्या घरामधून लक्ष्मण बरफ व त्याच्या साथीदारांनी चोरुन आणले होते व त्या पिशवी मध्ये असलेली २००० रुपयांची बंडले ही खोट्या नोटांची होती.
 
आम्हाला २००० रुपयांच्या नोटा पोलीसांनी जप्त केल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात त्या नोटा खोट्या होत्या व ती एकूण ८० बंडले म्हणजे साधारणतः एक कोटी साठ लाख एवढी रक्कम होती. अशीही माहिती दिली.आता या एवढ्या मोठ्या प्रमाणावर खोट्या नोटा भोंदूबाबाने घरामध्ये का ठेवल्या होत्या ? हा प्रश्न पडला आणि पुन्हा सर्वांना घेऊन आम्ही भोंदूबाबाच्या कुर्लोद गावाकडे निघालो. आखाडा- बरफपाडा हा गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूपतगडाच्या पायथ्याशी आहे. या भूपतगडाला वळसा घालून दीड तासाने आम्ही कुर्लोद गावामध्ये पोहोचलो. गावामध्ये पोहोचताच गावातील माजी सरपंच विष्णू बाळू बुधर यांच्यासह गावातील बरेच ग्रामस्थ जमले व त्यांनी या भोंदूबाबाच्या कहाण्या सांगायला सुरुवात केली.
गावामध्ये खूप लांबून-लांबून महागड्या गाड्या येतात. पैशांचा पाऊस पाडायचा कार्यक्रम चालतो. भोंदूबाबाचे दिल्लीतील मोठ्या नेत्यांशी संबंध असल्याने त्याच्यावर कारवाई होत नाही. त्याच्याकडे बोगस नोटा आहेत. त्याने त्या नदीकाठच्या दगडांमध्ये लपवून ठेवल्या आहेत. तो चारच वर्षात करोडपती झाला आहे. त्याच्याकडे पैसे पाडायला खूप लोकं येतात. त्याचे पोलिसांबरोबर संबंध आहेत, असे अनेक किस्से सांगितले. ते ऐकत-ऐकत आम्ही भोंदूबाबाच्या घराजवळ पोहोचलो. तिथे त्याची आई होती. आईने त्यांच्या घरावर दरोडा कसा पडला याचे रसभरीत वर्णन केले. दरोड्याची माहिती दिली. तेवढ्यातच गावातील एका मुलाने भोंदूबाबाने फाडून व पेटवून टाकलेल्या खोट्या नोटांचे तुकडे तिथे आणले व आम्हाला दाखवायला सुरुवात करताच वातावरण गरम झाले. ' हे पैसे आमचे नाहीत व माझ्या मुलाने कष्टाने कसे पैसे कमावलेत ', हे आईने सांगायला सुरुवात केली. त्यावेळी ग्रामस्थ व त्यांच्यामध्ये बाचाबाची होईल की काय ? हे लक्षात येताच आम्ही तेथुन निघालो व माजी सरपंच व या भोंदूबाबाविरुद्ध वारंवार तक्रारी करणाऱ्या विष्णू बुधर यांच्या घरी पोहोचलो. तेथे खूप सारे ग्रामस्थ जमले होते. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच भोंदूबाबाच्या करामतींचा पाढा वाचायला सुरुवात केली. सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर लक्षात आले की, या भोंदूबाबाच्या विरुद्ध पूर्ण गाव आहे. गावामध्ये घडणारे हे पैशांचा पाऊस पाडणारे अघोरी प्रकार त्यांनाही मान्य नव्हते. भोंदूबाबाच्याच एका नातेवाईकाने तर भोंदूबाबाने खोटे पैसे कुठे लपवून ठेवलेत ते ठिकाणही सांगितले. त्याचे फोटो काढून तेथील ग्रामस्थांनी आम्हाला पाठवले. ते सर्व पाहून व ऐकून आम्ही हैराण झालो. मोखाडा तालुक्याच्या ठिकाणापासून दुरवर अगदी वाडा तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या कुर्लोद सारख्या छोट्याशा गावातील इसमाने केलेल्या करामती थक्क करायला लावणाऱ्या होत्या. या गावामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये अगदी दिल्ली पासुन राजकारणी व धनाढ्य असामी पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमीषाने येत होत्या. भोंदूबाबाच्या घरासमोर अलिशान गाड्यांच्या रांगा लागत होत्या. एक अडाणी माणूस भल्या-भल्यांना राजरोस गंडा घालत होता आणि अनेकदा प्रकरण उघडकीस येऊनही हा भोंदूबाबा सहीसलामत सुटत होता. म्हणूनच हे प्रकरण हैराण करणारे होते.
 
ग्रामस्थांमध्येच गावचे पोलीस पाटील श्री. भिवा सखाराम मेंगाळ हे होते. त्यांनी सांगीतले की, त्याच्या घरावर याआधीही दरोडे पडले होते. पोलीस स्टेशनला तक्रारी आहेत. एकदा तर १ कोटी ५० लाखांची चोरी झाली होती. पण आधी तक्रार दिली मग त्याने तक्रार मागे घेतली. तर दुसऱ्या ग्रामस्थाने सांगीतले की, हा चौथा दरोडा, दोनदा पैसे नेले व एकदा ३ किलो सोने नेले. पण पोलीस स्टेशनला प्रकरण नेले की प्रकरण मिटते. हा नेमका प्रकार काय आहे? याची चौकशी करताच तेथीलच ग्रामस्थांनी सांगीतले की, हा भोंदूबाबा " ग्राहकांना फसवण्यासाठी खोट्या तक्रारी पोलीसांकडे करतो. पोलीसही त्यामध्ये सामील असतात." प्रकरण इंटरेस्टिंग वाटले. पोलीसांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयांची चोरी झाल्याची तक्रार नोंदवण्याचे नेमके कारण काय? याची माहिती घेतली असता समजले की, हा भोंदूबाबा पैसे पाडण्याचे फक्त नाटक करतो. पैसे जमा करतो. पैशांचा पाऊस पाडण्याचा विधी ( पूजा ) करण्याची तारीख जाहीर करतो आणि त्याआधीच घरावर दरोडा पडल्याचे नाटक करून पैसे चोरांनी पळवून नेले सांगून पैसे देणा-यांची फसवणूक करतो. यामध्ये मोखाडा पोलीसही सामील असतात. पोलीस सुरुवातीला तक्रार नोंदवण्याचे फक्त नाटक करतात. भोंदूबाबाची ही आयडिया ऐकून आम्ही थक्कच झालो. दुसऱ्या एका मुलाने सांगितले की, हा भोंदूबाबा ग्राहकांना पैसे घेऊन बोलवतो व पुजेला बसतानाच तो पोलीसांना टिप देतो. पुजेला ग्राहक व भोंदूबाबा बसलेला असतानाच पोलीस येतात मग भोंदूबाबा व ग्राहक पळून जातात व तिथे असलेले पैसे पोलीस घेऊन जातात मग पोलीस व हा भोंदूबाबा पैसे वाटून घेतात. प्रत्यक्षात हा भोंदूबाबा पैशांचा पाऊस पाडत नाही तर लोकांची दिशाभूल करून पैसे लुटतो आहे. त्याची लूटमार पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू आहे.
चर्चा चालू असतानाच एकाने खोट्या नोटांची बंडले लपवून ठेवल्याचे ठिकाण माहीत असल्याचे सांगितले. आम्ही त्यांनी आणलेल्या नोटा पाहिल्या तर त्या २००० रुपयांच्या नोटा या खेळण्यातल्या होत्या. एकाच नंबरच्या २००० रुपयांच्या नोटेसारख्याच दिसणार्‍या मात्र त्यावर CHILDREN BANK OF INDIA असे इंग्रजीत व ' भारतीय बच्चों का बँक ' असे हिंदीमध्ये लिहिलेले होते. याचाच अर्थ या नोटा मुलांच्या खेळण्यातल्या होत्या. आता या खेळण्यातल्या खोट्या नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणण्याचे कारण काय? त्यावर एका ग्रामस्थाने सांगितले की, हा भोंदूबाबा ग्राहकांकडून खरे पैसे घेतो व ते दुप्पट करून देतो, असे सांगून रात्री अंधारात घरामध्ये पूजेला बसतो. ग्राहकांना काही अंतरावर ठेवतो. ग्राहकांना वरून पैसे पडताना दिसतात पण ते खरे की खोटे हे ग्राहकांना समजत नाही. पैसे पडायला सुरुवात होताच पोलीस येतात व पळापळ सुरू होते. भोंदुबाबा व ग्राहक पळून जातात आणि पोलीस खरे पैसे घेऊन निघून जातात. खोट्या व बोगस नोटांचा हा असा वापर केला जातो तर ग्राहकांना भूल पाडण्यासाठी खोट्या नोटांच्या बंडलांमध्ये वर व खाली खऱ्या नोटा ठेवायच्या व ग्राहकांना पैशांच्या बंडलाचे ढिग दाखवायचे व हे पैसे रात्रीच पाडलेत, असे सांगून त्यांनाही खरे पैसे द्यायला भाग पाडायचे. त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनाही फसवायचे, असे प्रकार भोंदूबाबा करतो, असे सांगितले.
 
ग्रामस्थांबरोबरच चर्चा सुरू असतानाच भोंदूबाबाच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील आरोपी मोखाड्यावरून जव्हारला आणणार असल्याची माहिती मिळाली. आम्ही अॅड. प्रसन्ना भोईर यांना फोन करून खात्री करून घेतली आणि कुर्लोद वरून जव्हारकडे जायला निघालो. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास मोखाडा पोलिसांनी आरोपींना जव्हार न्यायालयामध्ये हजर केले. या केसमध्ये तसे तथ्य नसल्याने न्यायालयाने पोलीस कस्टडीतुन आरोपींची सुटका करून न्यायालयीन कस्टडी दिली. मात्र या भोंदूबाबाचा वशिला स्ट्रॉंग असल्याने जव्हार पोलिसांनी त्यांना तेथेच ताब्यात घेतले व जव्हार तालुक्यामध्ये घडलेल्या चो-यांचा तपास या आरोपींच्या माध्यमातून सुरू केला. खरं तर त्याला काहीही अर्थ नव्हता. क्राईम पोलीसांनी ३ दिवस तर मोखाडा पोलिसांनी ६ दिवस या पाचही आरोपींची ' कसून ' चौकशी केली होती. भोंदूबाबाने दिलेल्या तक्रारीमध्ये काहीही अर्थ नव्हता. उलट आरोपींकडे ज्या खोट्या नोटांची बंडले सापडली त्यावरून भोंदूबाबाचीच चौकशी व्हायला हवी होती. त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर या खोट्या नोटा घरांमध्ये का ठेवल्या होत्या? याची चौकशी केली असती आणि आरोपी व ग्रामस्थांनी दिलेले जबाब नोंदवून या भोंदूबाबाला ताब्यात घेतले असते तर मोठे कांड बाहेर पडले असते. पण भोंदूबाबा ही पोलिसांच्या दृष्टीने ' सोन्याची अंडी ' देणारी कोंबडी आहे. ती कापून चालणारे नव्हते म्हणूनच आत्ताचा पोलिसांचा तपास हा आरोपींनी न केलेल्या गुन्ह्याचा सुरू आहे. या आरोपींनी नेमके काय केले? याची माहिती घेतल्यानंतर पुन्हा धक्कादायक माहिती मिळाली.
 
या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी लक्ष्‍मण दामू बरफ (वय २५ ) याचे या भोंदूबाबाशी देण्या-घेण्याचे व्यवहार होते. त्यानेही पैसे दुप्पट करायला दिले होते. मात्र त्याला भोंदूबाबाची हातचलाखी माहित होती. भोंदूबाबा पुजेचा दिवस जाहीर करतो व त्याआधी ग्राहकांकडून पैसे जमा करतो याची कल्पना लक्ष्मणला होती. लक्ष्मण हा आखाडा याच गावातील रहिवासी. आखाडा व कुर्लोद ही दोन्ही गावे जवळ-जवळ. त्यामुळे लक्ष्मणचे जाणे-येणे होते. भोंदूबाबाकडे गोणी भरून पैसे आलेत याची माहिती लक्ष्मणला मिळताच त्याने त्याचे वाडा शहरातील मित्र अक्षय अनिल भानुशाली ( वय २९ ), हर्ष अनिल भानुशाली ( वय २४), राकेश सुक-या मोरे ( वय - २० ) किरण सुक-या मोरे ( वय - २५ ) व अन्य साथीदारांना आखाडा गावातील नदीवर दि. १०/१/२०२० रोजी पार्टीला बोलावले. मस्त दारु-कोंबड्यांची पार्टी केली आणि रात्री ९ च्या सुमारास या भोंदूबाबाच्या घरामध्ये हे सर्वजण घुसले. पूर्ण घर धुंडाळले मात्र त्यांना घरामध्ये रोख खरे ४५००० रुपये व खोट्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांशिवाय हाती काहीही लागले नाही. त्यामधील एक खोट्या नोटांनी भरलेली पिशवी, एक मोबाईल व तलवार असा ऐवज चोरून नेला. या चोरीची खबर फिर्यादी रमेश नवसु राथड ( वय - ३६ ) याला लागताच त्याने दि. ११/१/२०२० रोजी मोखाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली. त्याने फिर्यादीमध्ये ७८,३०० रुपयांची सोन्याची चेन, ३०,४०० रुपयांच्या सोन्याचा दागिना, ६६,६५५ रुपयांचा चांदीचा कमरपट्टा व ३ लाख रुपये रोख असा ४ लाख ७५ हजार ३५५ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार दाखल केली.
 
यापूर्वीही याच घरावर ३ दरोडे पडल्याची व करोडो रुपयांची चोरी झाल्याची अफवा मोखाडा पोलीसांना माहितीच होती. त्यामुळे त्यांनी या ही गुन्ह्याची फारशी दखल घेतली नाही किंबहुना पोलीसांना या खऱ्या गुन्ह्यातील आरोपी सापडले नाहीत. म्हणूनच या गुन्ह्याचा तपास पालघर पोलीस अधीक्षकांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असावा. तपास अधिकाऱ्यांनी मेहनतीने तपास सुरू केला. या गुन्ह्यामध्ये आरोपींनी ३००० रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरून नेला होता. हा मोबाईल यातील एक आरोपी हर्ष भानुशाली हा वापरत होता. त्या मोबाईलवरून पोलीस हर्ष भानुशालीपर्यंत पोहोचले. त्याने इतरांची नावे सांगितली. त्यापैकी ५ आरोपींना पोलिसांनी दि. ४ मार्च २०२० रोजी ताब्यात घेतले. दि.७ मार्च पर्यंत कसून चौकशी केली. खोट्या नोटांची पिशवीही ताब्यात घेतली. चौकशीमध्ये रोख ४५ हजार, ३००० रुपयांचा मोबाईल व एक २०० रुपयांची तलवार यापलीकडे काहीही हाताला न लागल्याने गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपींना दि. ७ मार्च रोजी मोखाडा पोलीसांच्या ताब्यात दिले. मोखाडा पोलिसांनी ' कसून ' चौकशी केली. त्यामध्येही काही निष्पन्न न झाल्याने आता याच ५ आरोपींचा ताबा जव्हार पोलीसांनी घेतला आहे. हे पाचही तरूण वाडा शहरातील आहेत. मित्रासोबत पार्टी करायला गेले आणि ४५००० रुपयांची चोरी करून आले. या चोरीला मोठ्या दरोड्याचा रंग देण्यात आला. मात्र दरोड्याची एकच बाजू पोलिसांनी तपासली. पोलिसांनी आखाडा गावातील घरामधून जप्त केलेल्या खोट्या नोटा भोंदूबाबाने नेमक्या का आणल्या होत्या? त्याचा वापर तो कशासाठी करत होता? त्याच्याच घरावर वारंवार दरोडे का पडतात? याबाबत तपास केला असता तर भोंदूबाबाची भांडाफोड झाली असती. मोठे- मोठे मासे गळाला लागले असते. खरा प्रकार उघडकीस आला असता आणि चार वर्षांपूर्वी विक्रमगड तालुक्यामध्ये उघडकीस आलेला पैशांचा पाऊस पडण्याचा प्रकार जसा बंद झाला तसाच मोखाडा तालुक्यातील हा पैशांचा पाऊसही कायमचा बंद झाला असता. मात्र या विक्रमगडच्या भोंदूबाबा पेक्षा मोखाड्याचा भोंदूबाबाचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणूनच पालघरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने हे प्रकरण आटोपते घेतले असावे. नाहीतर पालघरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने हे प्रकरण अक्षरशः खणुन काढले असते. हे प्रकरण मुळापासून उखडून फेकले असते. कारण सध्या गुन्हे अन्वेषण विभागाचा पालघर जिल्ह्यात दबदबा आहे. त्यांची कामगिरीही वाखाणण्याजोगी आहे. मात्र त्यांच्यावर दबाव आला असावा. ' वरून ' फोनाफोनी झाली असावी, म्हणूनच हा भोंदूबाबा सहीसलामत सुटलाय. विक्रमगडच्या भोंदूबाबाची केस अजूनही जव्हार कोर्टामध्ये सुरू आहे. त्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घातले होते. तेथेही ग्रामस्थांच्याच तक्रारी होत्या आणि त्या भोंदुबाबालाही विक्रमगड पोलीसांचीच साथ होती. आता मोखाड्याचा भोंदूबाबा जे खेळ खेळतोय तेच सेम खेळ हा भोंदूबाबाही खेळायचा.
 
विक्रमगड तालुक्यातील पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही आणि एकूणच पैशांचा पाऊस कधीच पडत नाही तर फक्त फसवणूकच होते, हे माहीत असूनही चांगल्या-चांगल्या घरांतील धनाढ्य लोकं आणि राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती का फसतात ? पैशांचा एवढा हव्यास का वाढला आहे? अंधश्रद्धेवरच एवढी श्रद्धा का आहे? अशी प्रकरणं कायमस्वरूपी का बंद होत नाहीत? असे अनेक प्रश्‍न जव्हार न्यायालयामधुन परतत असताना पडले आणि असेच १९९२ मध्ये घडलेले एक प्रकरण आठवले. १९९२ मध्ये इगतपुरी जवळील डोंगरामध्ये असेच एक प्रकरण घडले होते. तेव्हा आम्ही दै. सामना वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करत होतो. एक दिवस सकाळीच माझ्या ओळखीचा एक तरुण माझ्या घरी आला आणि त्याने एक सनसनाटी बातमी दिली. तो म्हणाला, " माझ्या वडीलांनी आम्हाला बरबाद केले. घरचे सगळे पैसे, दागीने विकुन व कर्ज काढुन एका रात्रीत लाखो रुपये गमावले. आम्ही भिकारी झालोय. आम्हाला ते पैसे परत मिळवून द्या." तेव्हा मी अवघा २१ वर्षाचा होतो. पत्रकार म्हणून बऱ्यापैकी नाव होते. दबदबा होता. मोठ-मोठे विषय हाताळत होतो. म्हणूनच मोठ्या आशेने तो तरुण आमच्याकडे आला होता. त्याला सविस्तर प्रकरण विचारलं तेव्हा कळलं की अति लोभापायी, पैशांच्या हव्यासापायी त्याच्या वडीलांनी सर्वकाही गमावलं होतं. पैसे दुप्पट करण्याच्या नादात ते असलेले पैसेही घालवून बसले होते. एकूणच प्रकार ऐकून हैराण झालो आणि त्या प्रकाराचा शोध सुरू केला. तेव्हा समजलं की, एका भोंदूबाबाने वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू व विक्रमगड या तालुक्यांतील ४० धनाढ्य व्यक्तींना एका रात्रीत भिकेकंगाल केलं होतं. अक्षरशः रस्त्यावर आणलं होतं.
 
इगतपुरी परीसरामध्ये त्यावेळी पैशांचा पाऊस पाडून नोटा दुप्पट करून देणारा एक बाबा उदयास आला होता. त्याने काही इसमांना मूर्ख बनवून नोटा दुप्पट करून दिल्या होत्या. त्यामुळे त्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. तो लोकांना पद्धतशीरपणे फसवत होता. ' याचे पैसे त्याला, त्याचे पैसे याला ' असा खेळ करून पैशांच्या पावसाचे ढोंग करत होता. त्याने त्याच्या समर्थकांकरवी अफवा पसरवली की इगतपुरी जवळील डोंगराच्या दरी मध्ये अमावस्येला १००० रुपयांच्या नोटांचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पाडणार आहे. ज्याला पैसे दुप्पट करून पाहीजे असतील त्यांनी पैसे जमा करावेत. ही चर्चा सर्वत्र पसरली. ती या तालुक्यांतील ध्यानाढ्य असामींपर्यंत पोहोचली. मग राजकारणी व श्रीमंत व्यक्ती एकत्र झाल्या आणि त्यांनी जेवढे जमतील तेवढे आणि जसे जमतील तसे पैसे जमा करून भोंदूबाबाकडे गेले. ही रक्कम खुप मोठी होती. भोंदूबाबाने सर्व रक्कम घेतली आणि इगतपुरीच्या डोंगरांमध्ये मोठा मंडप टाकून होमहवनाची तयारी केली. अमावस्येच्या रात्री १२ वाजता ज्यांनी पैसे दिले होते त्या ४० इसमांना बोलावले. ते तिथे गेल्यानंतर दूर माळरानावर त्यांना गाड्या ठेवायला सांगीतल्या व पुजा नग्न होऊन करायची असल्याने सर्व कपडे काढून पुजेच्या जागेपासून दूरवरील झाडावर नेऊन ठेवले. पुजेला बसवतानाच सांगीतले की, पुजा सुरू होताना सर्वांनी डोळे बंद करायचे व पैशांचा पाऊस संपेपर्यंत बंद ठेवायचे. जो डोळे उघडेल त्याला पैसे मिळणार नाहीत असे सांगून आणलेले पैसे त्याने एका चादरीवर जमा करायला सांगीतले. पुजा सुरू होताच सर्वांनी डोळे बंद केले.
 
पुजा सुरु करताच भोंदूबाबाच्या समर्थकांनी सर्व पैसे गोळा केले, त्यांचे झाडावर ठेवलेले कपडे घेऊन तेथून पोबारा केला. थोड्या वेळाने बाबाही त्या अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारामध्ये पळून गेला. दोन तासानंतर एकाला शंका आली म्हणून त्याने डोळे उघडले तर समोर फक्त होम पेटत होता. आजुबाजुला कुणीही नव्हते. भोंदूबाबाही दिसत नव्हता की त्याचे चेलेही नव्हते. मग त्याने इतरांनाही डोळे उघडायला सांगीतले. एकंदरीत घडलेला प्रसंग त्यांच्या लक्षात येताच त्यांचे ' डोळे खडकन उघडले.' आपण फसलो गेलोय, याची जाणीव झाली आणि त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ते पूर्ण हादरून गेले. पैसे तर गेलेच पण कपडेही गेले होते. रात्रीच्या भयाण अंधारामध्ये नग्न अवस्थेत ते अापल्या वाहनांपर्यंत पोहोचले. वाहनांमध्ये पैशाचा पाऊस पडल्यानंतर नोटा भरून आणायला म्हणून ठेवलेली पोती अंगाला गुंडाळली आणि रात्रीच्या अंधारातच आपापली घरे गाठली. एका अशिक्षीत, अडाणी व सामान्य व्यक्तीने राजकारणातील माहीर, पैशाने गर्भश्रीमंत व उच्चशिक्षीत अशा ४० लोकांची कोट्यावधी रुपयांना सहज गंडा घातला होता. पुन्हा तो बाबा कोण ? कुठला ? कुठे गेला ? याची कुणाकडेही माहीती नव्हती. त्यामुळे त्याच्याकडून पैसे कसे वसूल करायचे हा प्रश्न पडला. पोलीसांकडे जाता येत नव्हते. तक्रारही करता येत नव्हती.
  
माझ्याकडे आलेल्या त्या तरुणाने ही बातमी ' सामना ' मध्ये छापायचा आग्रह केला. मात्र तक्रार नसल्याने, कुणीही पुढे येऊन सांगायला तयार नसल्याने तसेच काहीच पुरावा नसल्याने सामनाचे त्यावेळचे कार्यकारी संपादक अशोक पडबिद्री यांनी बातमी प्रसिद्ध करायला नकार दिला. त्यानंतर आम्ही त्या बाबाला खुप शोधले मात्र बाबा काही सापडला नाही आणि पैसे काही मिळाले नाहीत. सर्वांनाच पैशांवर पाणी सोडायला लागले होते. कुठेही त्याची वाच्यता करता येत नव्हती. मग आम्ही ही ते प्रकरण तेथेच थांबवले.  १९९२ मध्ये ही घटना घडली तशीच २२-२३ वर्षापूर्वी वाडा तालुक्यामध्येही अशीच घटना घडली होती. वाडा, कुडूस, अंबाडी, वज्रेश्वरी व भिवंडी परिसरातील काही व्यक्तींनी पैशांचा पाऊस पाडण्याचा ' धंदा ' सुरु केला होता. एका घरामध्ये रात्रीच्या अंधारात पुजा मांडायची आणि घराच्या माळ्यावरून पैसे पाडायचे. सुरुवातीला काही लोकांना मूर्ख बनवून पैसे दुप्पट करून दिले. त्यानंतर मोठा हात मारला. मात्र एक इसम या पैसे पाडणार्‍यांना नडला. त्याने वाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आणि पैसे पाडणाऱ्यांना अटक झाली. पैसे पाडण्याच्या खेळामध्ये झालेली ती पहिली अटक. कारण फसले गेलेले कुणीही तक्रार करायला तयार नसतात. तक्रार करायला गेले तर पोलीस तुम्ही एवढे पैसे कुठून आणले ? इन्कमटॅक्स भरला आहे का ? हिशेब दाखवा, असे प्रश्न विचारुन भांडावून सोडतात. त्यातच हा गंडवा-गंडवीचा धंदा पोलीस सामील असल्याशिवाय सुरुच करता येत नाही. पोलिसांना सर्व काही माहिती असते.
 
विक्रमगडच्या प्रकरणामध्येही पोलीस सामील होतेच. तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून पैशांचा पाऊस पाडण्याचा ' धंदा ' बंद केला होता. पोलिसांनी जर या भोंदूबाबांना साथ दिली नाही तर ते असे धंदे ते करुच शकत नाहीत. मोखाड्याच्या प्रकरणामध्येही काही पोलीस भोंदूबाबाला सामील आहेत म्हणूनच तो राजरोस हा ' गंडवा-गंडवीचा धंदा ' करतोय. विशेष म्हणजे प्रकरण उघडकीस येऊनही पोलीसांनी त्या भोंदूबाबाची साधी चौकशीही केलेली नाही. यावरूनच त्या भोंदूबाबाचे लागेबांधे किती वरपर्यंत पोहचलेले आहेत हे लक्षात येते. पैशांचा पाऊस पाडणारे भोंदूबाबा, काळी हळद वापरुन गुप्त धन काढणारे ठग, मांडूळ सापाची पुजा करुन पैसे दुप्पट करुन देणारे महाभाग यांची चर्चा सर्वत्र आणि सर्वदूर होत असते. कुठलीही चलनातील नोट छापायला शाई, कागद, रंग व इतर साहीत्य लागते. छापखान्यामध्येच ती नोट तयार होऊ शकते, हे माहिती असुनही हवेतुन नोटा पडतीलच कशा ? पैशांचा पाऊस पडेलच कसा ? एवढेही या फसले गेलेल्या महाभागांना कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. तसच जर असतं तर टाटा, बिर्ला, अंबानी यांनी कारखाने काढलेच नसते, त्यांनी पैशांचा पाऊस पाडण्याचीच विद्या शिकुन घेतली असती वा ज्यांना ही विद्या माहिती आहे त्यांनाच नोकरीला ठेऊन रोज पैशांचा पाऊस पाडत बसले असते. आणि ज्यांना ही विद्या अवगत आहे त्यांनी तरी दुसऱ्यांना पैसे का पाडुन दिले असते ? त्यांनी स्वतःच पैसे पाडुन ते श्रीमंतीमध्ये लोळत बसले असते. हा साधा विचारही कुणी करताना दिसत नाही. मोखाड्याच्या भोंदूबाबाकडे खूप दूरवरून चांगल्या-चांगल्या घरातील उच्चशिक्षित मंडळी येत होती. त्यांना फसविण्यासाठी त्याने मुलांच्या खेळण्याच्या नोटांचा आधार घेतला होता. गोणीच्या गोणी भरून नोटा त्याने घरामध्ये आणून ठेवल्या होत्या. पोलीसांनी त्या नोटा पकडूनही त्याची चौकशी झालेली नाही. होणारही नाही कारण हा भोंदूबाबा पोलीसांच्या दृष्टीने ' सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ' आहे. ती कोंबडी ते कापून खाणार नाहीत. त्यामुळे त्याचा हा गंडवा-गंडवीचा धंदा असाच सुरू राहील. मात्र त्याच्याकडे पैसे दुप्पट करून देण्यासाठी आणि पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जाणाऱ्या महाभागांनी जरा विचार करावा. असे कुणीही पैसे पाडु शकत नाही आणि कुणीही पैसे दुप्पट करून देऊ शकत नाही. ती अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणूनच अशा बुवा-बाबांच्या नादाला लागून स्वतःची फसगत करून घेऊ नका, पश्चातापाशिवाय तुमच्या हाताला काहीही लागणार नाही.