रोहितनेही त्याच्या चाहत्यांना स्वतःसह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले

जनदूत टिम    16-Mar-2020
Total Views |
मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरात सुमारे दीड लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. या दरम्यान, सोमवारी टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माने एक व्हिडीओ पोस्ट करून साऱ्यांना खास संदेश दिला.
 
rohit_1  H x W: 
 
रोहितनेही त्याच्या चाहत्यांना स्वतःसह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्याचे दिवस सर्वांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहेत. जगभरात करोना व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. करोनावर मात करण्यासाठी सर्वांनी जागरूकपणे एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या आजुबाजुला काय चाललंय, यावर आपलं बारीक लक्ष पाहिजे. जर कोणाला या रोगाची लक्षणे दिसल्यास त्याने त्वरीत नजीकच्या रुग्णालयाला कळवलं पाहिजे, असा संदेश रोहितने व्हिडीओच्या माध्यमातून दिला.
याशिवाय, आपलं आयुष्य धोक्यात घालून करोनाग्रस्तांवर उपचार करण्यास कार्यरत असलेले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच, या आजारात मृत्यूमुखी पावलेल्या कुटुंबीयांसाठी मी दुःख व्यक्त करतो, असे रोहित शर्माने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. कोरोना आजाराचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपययाोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. साऱ्यांनी खंबीर आणि कणखर राहा, असे आवाहन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विटरद्वारे केले होते. करोनाविरुद्ध लढा देऊ, असा संदेशही कोहलीने दिला होता.