राज्यात अजून चौघांना करोनाची लागण - आरोग्यमंत्र्यांची

जनदूत टिम    16-Mar-2020
Total Views |
मुंबई : राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्रात अजून चार जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामधील तिघे मुंबईतील तर एक नवी मुंबईतील आहे. यामधील दोन जण कुटुंबाच्या संपर्कात आले तर इतर दोघेजण परदेशात प्रवास करुन आलेले आहेत”. पनवेलमधील विलगीकरण कक्षात ३३ जणांना ठेवण्यात आलं असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. कोणीही पळून गेलेलं नसून चुकीची अफवा पसरली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
coronavirus_1  
 
करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून रुग्णांच्या संख्येत सोमवारी वाढ झाली आहे. करोनाची लागण झालेल्यांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकाळी माहिती देताना चार जणांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. यामधील तिघे मुंबईतील तर एक नवी मुंबईतील आहे. त्यानंतर आता यवतमाळमधील एका महिलेला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. महिला काही दिवसांपूर्वी दुबईहून परतली होती. त्यामुळे आता रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली असल्याची माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी एमडी सिंह यांनी दिली आहे. 
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांशी चर्चा करणार आहेत. चांगले निकाल यावेत यासाठी अजून काही काळजी घेणं आवश्यक आहे. आरोग्य विभागाची बैठक पार पडली असून फक्त शहरी भागातील नाही तर ग्रामीण भागातील शाळाही बंद केल्या पाहिजेत. तसंच सर्व परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत यावर सर्वांचं एकमत झालं. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी कशी कमी करता येतील यावरही चर्चा झाली. खासगी कंपन्यांना बंद करण्याचा निर्णय घेतला पाहिजे यावरही चर्चा झाली. नवे काही आदेश दिले पाहिजेत का ? यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत सहली किंवा व्यावसायिक दौऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. खासगी सहल कंपन्या (टूर ऑपरेटर) किंवा व्यक्तींना असे दौरे ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत आयोजित करता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. मॉल्स, सिनेमागृहे, नाटय़गृहे, शाळा-महाविद्यालये याबरोबरच संग्रहालयेही बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून मुंबईत पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.