तुळजापूर मंदिर दर्शनासाठी बंद

जनदूत टिम    16-Mar-2020
Total Views |
तुळजापूर:  सध्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मंदिर प्रशासनाने तुळजापूर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
यामुळे कुठल्याही व्हीआयपी व्यक्ती किंवा सामान्य नागरिकाला मंदिर दर्शनाचा लाभ घेता येणार नाही. देवीची पूजा ही मंदिराचे महंत व पाळीकर पुजारी करतील. मंदिरामध्ये ४ पेक्षा जास्त पुजारी उपस्थित राहू शकणार नाहीत. देवीचे दैनंदिन धार्मिक विधी भाविकांविना पार पडणार असून याचा मंदिर प्रशासनाला मोठा फटका देखील सहन करावा लागणार आहे.
 
Tuljabhavani_1  
 
मात्र, असं असलं तरीही मंदिर प्रशासनाने लाईव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. जिओ लाईव्ह टीव्ही आणि तुळजापूर मंदिर प्रशासनाच्या फेसबुक पेजवर लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेता येणार आहे. तसेच मंदिर हे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहे. दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या निर्णयाला ग्रामस्थांचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळे आता तुळजापूरप्रमाणेच राज्यातील इतरही महत्त्वाचे देवस्थान मंडळं असाच निर्णय घेतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
तुळजापूर मंदिरामध्ये रोज देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. यामध्ये पुणे जिल्ह्यातील भाविकांची संख्या जास्त असते. सध्या पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जर काही संशयित रुग्ण दर्शनाला आल्यास इतर भाविकांना याची लागण होऊ शकते. त्याच प्रमाणे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने तुळजा भवानीचं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याशिवाय चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.