महाराष्ट्रातील नगरपालिकांचे ११२५ कोटी रुपये येस बँकेत अडकले

जनदूत टिम    16-Mar-2020
Total Views |
मुंबई : येस बँकेतील आर्थिक संकटाचा मोठा फटका सामान्य ग्राहकांसोबतच महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांनाही बसला आहे. राज्यातील विविध महानगरपालिकांचे जवळपास ११२५ कोटीहून अधिक पैसे येस बँकेत अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतर्कता म्हणून राज्य सरकारने विविध खासगी बँकांमधील ठेवींची माहिती मागवली आहे. असा हिशोब मागण्याची राज्य सरकारची ही दुसरी वेळ असून येस बँक आर्थिक संकटात सापडल्यामुळे ही काळजी घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
 
Udhhav_1  H x W
 
राज्य सरकारने आपल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्था, राज्याचे सार्वजनिक विभागांचे उपक्रम, स्वायत्त संस्था आणि इतर सरकारी विभागांचे येस बँकेसह इतर कोणत्या खासगी बँकेत किती पैसे आहेत याची माहिती मागितली आहे. यात वेतन खात्यांचाही समावेश आहे. मागील काही काळात राज्य सरकारने एक्सिक बँकेतील वेतन खाती मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय बँकेत वर्ग केली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आदेशात संबंधित विभागांना पैसे ठेवण्यासाठी खासगी बँकांऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा उपयोग करण्यास सांगितलं आहे. राज्यातील नाशिक महानगरपालिका, नाशिक स्मार्ट सिटी प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवडचे येस बँकेत जवळपास ११२५ कोटी रुपये अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्तकता म्हणून उद्धव ठाकरेंनी ही माहिती मागवल्याचं सांगितलं जात आहे.
 
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे ८०० कोटी, नाशिक महागरपालिकेचे 310 कोटी आणि नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडचे १५ कोटी रुपये येस बँकेत जमा आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रवण हार्डिकर यांनी येस बँकेतील आपली जमा रक्कम १,१०० कोटीवरुन ८०० कोटी रुपयांपर्यंत कमी केली आहे. या व्यतिरिक्त इतर बँकेत त्यांचे ४,००० कोटी रुपये
जमा आहेत.