धरणांच्या तालुक्यात स्थानीकांची पाण्यासाठी वणवण ही शोकांतीका - …विवेक पंडित

जनदूत टिम    15-Mar-2020
Total Views |
शहापूर : राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा दिनांक 12 आणि 13 मार्च रोजी शहापूर तालुका दौरा पार पडला. धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्यातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण वणवण भटकावे लागत असल्याचे भीषण वास्तव समोर आले. शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा हि मोठी धरणे असूनही या धरणाशेजारी असलेल्या एकुण ९७ गावं आणि २५९ पाड्यांमध्ये विशेषता: अदिवासी पाडे आणि वाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी स्थिती निर्माण झाल्याचे मत आढावा समिती अध्यक्ष श्री.विवेक पंडित (राज्यमंत्री दर्जा) यांनी व्यक्त केले. तसेच धरणांच्या तालुक्यात स्थानीकांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे ही शोकांतीका आसल्याचेही त्यांनी म्हटले. येथील नागरिकांच्या व्यथा ऐकून आधी मुंबई महापालिकेने शहापुर वासियांना पाणीपुरवाठा करावा अन्यथा येथील नागरीक रस्त्यावर येतील असा इशाराही श्री. पंडित यांनी दिला.
 
Vivek Pandit_1  
 
शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणांतून मुंबईला पाणिपुरवठा होत आहे. मात्र या धरणांशेजारी असलेल्या गावांमध्ये विशेषता: अदिवासी पाडे आणि वाड्यांमध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तानसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आघई-ठाकुरपाडा, नेवरे कातकरीवाडी, वाघीवली, पलीचापाडा, वेलोंडा, सावरेली, सापटेपाडा, वेडवाहाळ, या गाव पाड्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई सुरू झाली आहे. तसेच भातसा धरणाच्या बाजुला असलेले कोठारे, साकडबाव, वेळुक आणि वाशाळा, दळखन या ग्रृप गांमपंचायतीमधील 14 गावं आणि सुसरवाडी, पाटोळवाडी, वेटेपाडा, विंचुपाडा, काष्टी असे 29 पाडे पाण्याविणा तहानलेलेच आहेत. यातील काही गावांमध्ये नावापुरती नळ योजना राबवलेली आहे मात्र प्रत्यक्षात नळाला पाण्याचा थेंबही येत नाही.
 
याशिवाय वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरणाच्या परिसरातील विहिगाव ग्रामपंचायत आणि माळ ग्रामंचायतीमधील गाव आणि त्यांचे 24 आदिवासी पाडे आणि दुर्गम डोंगर वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना रानोमाळ वणवण करावी लागत आहे. त्यामुळे या गावांना महापालिकेने सेस फंडाचा निधीची उपलब्धता करून देऊन जिल्हापरिषदेच्या मध्यमातून या तहानलेल्या गावांना व पाड्यांना पाणीपुरवाठा करावा असे मत श्री. विवेक पंडित यांनी तहसिल कार्यालयात झालेल्या आढावाबैठकीत व्यक्त केली. याशिवाय शहापुर तालुक्यातील अनेक गावात जायला अजूनही पक्का बारमाही रस्ता, आदाविसी पाड्यांवर जाण्यासाठी अंतर्ग रस्ते, रोजगार, वीज, आरोग्य, वन हक्क दावे, वनातील कातकरी निवासस्थान, खाजगी आणि सरकारी जागेवरील घरांखालील जागा, गावठण तसेच शिक्षण व शिश्यवृत्तीच्या प्रलंबीत प्रश्नाबाबत नागरिकांनी उपस्तीत केलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याबाबत आढावा बैठकीला उपस्थीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या आढावा बैठकीला शहापुरच्या तहसिलदार श्रीम. निलीमा सुर्यवंशी, सहाय्यक गट विकास अधिकारी सुशांत पाटील, पोलिस निरिक्षक श्री आढाव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख तसेच श्रमजिवी संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.