माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे दुःखद निधन

जनदूत टिम    15-Mar-2020
Total Views |
फलटण : सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे पुणे येथील खासगी इस्पितळात दीर्घ आजारावर उपचार सुरु असताना आज सकाळी वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली असून त्यांना आदरांजली म्हणून आज फलटण शहरामध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला आहे. १५ ऑगस्ट ११९४८ रोजी त्यांचा जन्म फलटण येथे झाला. एक संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा उदय झाला होता. राजकारणाबरोबर पत्रकारितेमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवला होता.
 
hindurao Naik_1 &nbs
 
फलटणमधील माजी आ. कॉ. हरिभाऊ नाईक-निंबाळकर यांच्या शिवसंदेश या दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक तसेच सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ते माजी कार्याध्यक्ष होते. अतिशय संघर्षातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली होती. युवक कॉंग्रेसमध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या राजकीय कार्यकर्तृत्वाची चमक दाखवली होती. त्यानंतर अकराव्या लोकसभेत १९९६ साली ते शिवसेनेच्या तिकिटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. सुमारे दोन वर्षे त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधीत्व केले.
 
आपल्या अल्प खासदारकीत फलटण-लोणंद व फलटण-बारामती ही रेल्वेसेवा सुरु करण्यासंबंधीचा प्रस्ताव माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासमोर मांडून तसेच याचा वेळोवेळी पाठपुरावा करुन ही योजना मंजूर केली होती. सुमारे २२ वर्षानंतर त्यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक-निंबाळकर या मार्गावर प्रत्यक्षात रेल्वे सुरु करुन त्यांचे स्वप्न साकार केले. फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी त्यांनी पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढल्या. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज धोम-बलकवडीचे पाणी फलटण तालुक्यात खळखळत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुमारे २० वर्षापूर्वी त्यांनी स्वराज ऍग्रो ची स्थापना करुन निंभोरे येथे स्वराज दूध डेअरीची स्थापना केली होती. तसेच त्यांनी उपळवे येथील माळरानावर फलटण तालुक्यातील तिसरा सर्वात मोठा साखर कारखाना उभारुन हिंदुराव नाईक-निंबाळकर काहीही करु शकतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. फलटण तालुक्यातील या संघर्षशील लोकनेत्याची आज दि. १५ मार्च रोजी पुणे येथील खासगी इस्पितळात प्राणज्योत मालवली.
 
फलटणच्या किंबहुना सातारच्या राजकारणातील एक ढाण्या वाघ हरपला, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज सकाळी ११ पर्यंत त्यांचे पार्थिव फलटण येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी ४ वाजता त्यांच्यावर फलटण येथील आईसाहेब नगर (मलठण) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली असून त्यांच्या पश्चात पत्नी, माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेर नाईक-निंबाळकर, स्नुषा जि. प. सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर, सुना व नातवंडे असा परिवार आहे.