आठवीतील धाडसी कामेश्वरचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

जनदूत टिम    15-Mar-2020
Total Views |
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्यांने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या, दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरने नदीत उडी घेऊन मोठ्या धाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढले. या कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनातील त्यांच्या दालनात धाडसी कामेश्वर वाघमारे याचा सत्कार केला व त्याचे कौतुक केले. यावेळी लोहा येथील आमदार श्यामसुंदर शिंदे, कामेश्वरचे वडील जगन्नाथ वाघमारे उपस्थित होते.

Udhhav Cm_1  H
 
मनोविकास माध्यमिक शाळेतील, इयत्ता दहावीत शिकत असलेले, ओम विजय मठपती, आदित्य कोंडीबा दुऊंदे, गजानन विश्वनाथ श्रीमंगले हे तिघे विद्यार्थी घोडज येथील ऋषी महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराजवळ असलेल्या माणार नदीत अंघोळ करून ते दर्शनाला जाणार होते. नदीपात्रातील पाणी पायऱ्यांपर्यंत आल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, तिघेही विद्यार्थी पाण्यात बुडत असताना ओरडण्याचा मोठा आवाज आला, हा आवाज कामेश्वर वाघमारेच्या कानावर पडला. कामेश्वरने मोठ्या साहस व धाडसाने यातील दोघांना वाचवण्यात यश मिळवले, परंतु ओम मठपती याला वाचवण्यात तो अपयशी ठरला.या धाडसी कामगिरीबद्दल कंधारच्या तहसिलदारानी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी कामेश्वर वाघमारे यांच्या नावाची शिफारस जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे केली आहे.