भिवंडी तालुक्यामध्ये चक्क चारशे कुपोषित बालके आढळली

जनदूत टिम    13-Mar-2020
Total Views |
भिवंडी : गेल्या दोन महिन्यात ३९४ कुपोषित बालके तालुक्यात आढळून आल्याची धक्कादायक बाब शासनाला पाठविलेल्या अहवालातून समोर आली आहे. बालके कुपोषित होऊ नये, यासाठी शासन योजनेतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी गरोदर महिला व बालकांवर खर्च केला जात आहे. मात्र तो खर्च व्यर्थ झाल्याचे उघड झाले आहे. आदिवासीपाडा, वीटभट्टी तसेच अन्य गाव पाड्यात हि कुपोषित बालके आढळून आल्याचा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या लेखी अहवालात नमूद केले आहे.
 
Kuposhit_1  H x
 
तालुक्यातील चावे गावातील अंगणवाडीत देखील सात कुपोषित बालके आढळून आली आहेत. दरम्यान वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या मजुरांच्या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे कुपोषण निर्मूलन योजनेत गैरकारभार होत असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात वीटभट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून या वीटभट्टीवर भिवंडीतील आदिवासी पाड्यांबरोबरच शहापूर, मुरबाड, जव्हार, मोखाडा,वाडा, तलासरी, डहाणू तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने वीटभट्टी कामगार म्हणून काम करतात. दिवस रात्र वीटभट्टीवर राबूनही त्यातून त्यांना दिला जाणारा मजुरीचा अत्यल्प व तुटपुजा स्वरूपाचा असल्याने मेहनत करूनही या वीटभट्टी कामगारांवर नेहमीच आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अनेक वेळा या मजुरांना दोन वेळचे जेवण देखील मिळत नाही आणि हे सत्य नाकारता येत नाही.
 
भिवंडी तालुक्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या दिवेअंजूर, कोनगांव, खारवाव, पडघा, अनगाव, दाभाड, वज्रेश्वरी, चिंबीपाडा अशा ८ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २२७ वीटभट्टी कामगारांची मुले पाहणीत आढळली आहेत. तर स्थलांतरित कुटुंब संख्या ६ हजार १८० मुले, ते ३ वर्ष गटातील १ हजार ९७० मुले, आणि ३ ते ६ वर्ष वयोगटातील २ हजार २८० मुले आहेत. कुपोषणाची लागण झालेले ५२ मुले आहेत. अतितीव्र कुपोषित ३४२ मुले आहेत. हि सर्व मुले तालुक्यातील ५५ गावामध्ये आढळल्याचा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकारी व आरोग्य विभागाने अहवालात नमूद केले आहे.
 
भिवंडी तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या बालविकास दोन प्रकल्पाअंतर्गत ४२८ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. गरोदर, स्तनदा माता महिला व लहान बालकांना घरपोच पोषण आहारामध्ये धान्य पुरवठा करणे तसेच ३ ते ६ वर्ष बालकांना ताजा आहार, गरोदर व स्तनदा माता यांना तसेच ७महिने ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी या सारखे पौष्टिक खाद्यपदार्थ देवून त्यांचे वजन, उंची तपासणे. आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम राबविणे, अशी विविध कामे अंगणवाडी सेविकामार्फत होणे आवश्यक आहे. ते योग्यरित्या करण्यात येत नाही. त्यामुळे भिवंडी तालुक्यात कुपोषणाच्या रुग्णामध्ये वाढ होत असल्याचे ५५ गावात ४२८ अंगणवाडी केंद्राअंतर्गत ३९४ बालक कुपोषित असल्याचे उघड झाले आहे. जिपच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुपोषित बालकांवरउपचाराची सोय नसल्याने दाभाड येथील नानु कुभार यांच्या वीटभट्टीवर ट्रॅक्टरवर मजुरी करण्यासाठी पत्नी सुरेखा, मुलगी भूमिका व एक वर्षाची तनुजा यांसह आले असून त्यांची दोन्ही मुले हि कुपोषित असल्याने त्यांना स्व.इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.