लाचखोरांवर एकाच दिवशी ३ ठिकाणी धाड

जनदूत टिम    13-Mar-2020
Total Views |
ठाणे : गुरुवारी एकाच दिवशी एसीबी पथकाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप लावून लाचखोरांवर कारवाई केली. जात वैधता प्रमाणपत्र देण्यापासून लेबर कॉन्ट्रॅक्टरचे बिल काढण्यासाठी लाच मागणारे तीन सरकारी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून टिटवाळ्यामध्ये अनधिकृत बांधकामाची तक्रार न करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईक व एका दलालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी लाचखोरांवर झालेल्या या ट्रॅपमुळे भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या दोघांवर गुरुवारी एसीबी पथकाने ठाण्यातील वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये कोकण विभागांतर्गत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीत वरिष्ठ संशोधन अधिकारी असलेल्या स्नेहल गोवेकर (४५) व कामाठी अमित मोरे (३८) या दोघांनी २१ वर्षीय तक्रारदाराकडे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाच मागितली होती.
 
corruption_1  H
 
तर दुसऱ्या प्रकरणात मुंब्रा प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता संजय वाघुले (४४) याने ५३ वर्षीय लेबर कॉन्ट्रॅक्टरकडे कामाचे बिल मंजूर करण्यासाठी १ लाख २५ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती ८० हजार रुपये स्वीकारताना वाघुले आढळला दरम्यान, टिटवाळ्यातही ४५ वर्षीय तक्रारदाराच्या ५ अनधिकृत खोल्यांच्या चाळीच्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी कल्याण तालुका पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक नारायण गाडे (३८) व दलाल हेमंत भगत (३८) या दोघांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यातील १५ हजार रुपये हा पहिला हफ्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने भगत याला रंगेहाथ पकडले. तर पोलीस नाईक गाडे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. इतर लाचखोर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरु असून त्यानंतर त्यांनाही अटक करण्यात येईल, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.