कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज

जनदूत टिम    12-Mar-2020
Total Views |
सोलापूर : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
 
corona_1  H x W
 
बैठकीस महापालिका आयुक्त दीपक तावरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर वाघमारे, अश्विनी हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉ. सत्येश्वर पाटील, राज्य राखीव पोलीस बल गटाच्या आरोग्य अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, रेल्वेचे डॉ. संजीव ए. के., डॉ. विठ्ठल घडके आदी उपस्थित होते. कोरोना विषाणूची पुण्यात पाच जणांना बाधा झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे सर्व दवाखाने आणि खासगी रुग्णालये येथे कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत जागरुकता निर्माण करावी. विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, याची लोकांना माहिती द्यावी , असे शंभरकर यांनी सांगितले.
 
परदेशातून जाऊन आलेल्या किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्याक्तिस कोरडा खोकला, ताप, घसा दुखणे अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ नजीकचे शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत. यासंदर्भात देखरेखेसाठी आणि नियंत्रणासाठी टोल फ्री क्रमांक १०४ आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष (०२१७ २७३१०१२) सुरु करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी खासगी रुग्णालये, खासगी वैद्यकीय संस्था यांनी सहकार्य करावे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. लोकांचे प्रबोधन करावे, असे आवाहनही शंभरकर यांनी केले. बैठकीस डॉ. सुदीप सारडा, डॉ. माधव गुंडेटी, डॉ. संतोष हराळकर, डॉ. सुधांशू कोठडिया, डॉ. पुप्पाई अग्रवाल, डॉ. रोजन बेंबरे, डॉ. रामेश्वर डावकर, डॉ. सुरेश कंदले आदी उपस्थित होते.
 
कोरोना संसर्गाची लक्षणे :-
कोरडा खोकला
ताप येणे
घसा दुखणे
अशक्तपणा
श्वासास त्रास होणे
 
काय करावे :-
प्रवास टाळावा
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये
खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा
वैयक्तिक स्वच्छता पाळावी
साबणाने हात धुवावे
गर्दी होईल असे कार्यक्रमाचे संयोजन टाळावे
अफवांवर विश्वास ठेऊ नये.