भिवंडीत वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागाने वीज कर्मचाऱ्यांना मारहाण

जनदूत टिम    12-Mar-2020
Total Views |
भिवंडी : पाच महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा न केल्याने वीजपुरवठा खंडित करून मीटर काढल्याच्या रागातून थकबाकीदार ग्राहकाने वीज कर्मचाऱ्याला मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना भिवंडीतील पिंपळास गावात बुधवारी घडली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Matter_1  H x W
 
राजेश नाणु मुकादम (रा.मुकादम चाळ, पिंपळास ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून त्याने आपल्या घरगुती वापराचे वीज बिल मागील पाच महिन्यांपासून भरलेले नव्हते. एकीकडे मार्च इंडिंग सुरु झाल्याने वीज वितरण कंपनीने थकबाकी धारकांना वीज बिल भरणा करण्यासंदर्भात अनेक सूचना देऊनही त्या सूचना व नोटिसकडे दुर्लक्ष केल्याने या थकीत वीज बिल धारकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने हाती घेतली असून बुधवारी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी विजय दशरथ बावणे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पिंपळास येथील मुकादम चाळ येथे राहणाऱ्या राजेश मुकादम याच्याकडे गेले असता त्यांना थकबाकी भारण्यासंदर्भात विनंती केली मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर वीज कर्मचारी बावणे यांनी थकबाकीदार राजेश यांचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढून घेतले. त्याचा राजेश यास राग आल्याने त्याने कर्मचारी बावणे यांना शिवीगाळ व मारहाण केली तसेच बावणे यांचे सहकारी सोमवार पाटील व भरत यांस देखील शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केला. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शेरखाने करीत आहेत.