आयुर्वेद व्यासपीठतर्फे महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यात पोस्ट कोविड क्लिनिकचा दि. १० डिसेंबरपासून शुभारंभ

जनदूत टिम    08-Dec-2020
Total Views |

अल्पदरात आयुर्वेदिक औषधे, उपचार व आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध होणार

नगर : सामाजिक गरज लक्षात घेऊन आयुर्वेद व्यासपीठ तर्फे महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यात पोस्ट कोविड क्लिनिकच्या सेवेचा शुभारंभ गुरूवार दि. १० डिसेंबर २०२० पासून करण्यात येणार आहे. त्यासाठीची जय्यत पूर्वतयारी करण्यात आली आहे. या क्लिनिकमध्ये अल्पदरात आयुर्वेदिक औषधे, उपचार व आरोग्य मार्गदर्शन सेवाभावी वैद्य देणार आहेत. वैद्यांनी मोठ्या संख्येने या समाजसेवी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुर्वेद व्यासपीठतर्फे करण्यात आले आहे.
 
ayurved_1  H x
 
या उपक्रमाचा ऑनलाईन शुभारंभ नुकताच करण्यात आला. कार्यक्रमाचे उद् घाटक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आयुष टास्क फोर्सचे अध्यक्ष-पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, दिल्ली येथील भारतीय चिकित्सा केंद्रिय परिषदेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपूजारी आणि श्रीधुतपापेश्वर लि.चे कार्यकारी संचालक रणजित पुराणिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वैद्य मंदार भणगे यांनी धन्वंतरी स्तवनाने केली. वैद्या उर्मिला पिटकर, वैद्या मृणाल जामदार आणि वैद्या नलिन शाह यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. केंद्रीय कार्याध्यक्षा वैद्या रजनी गोखले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करताना पोस्ट कोविड क्लिनिक या उपक्रमाची माहिती देऊन कोव्हीडच्या काळात आयुर्वेद व्यासपीठाच्या सर्व शाखांनी केलेल्या वैद्यकिय सेवा कार्याचा आढावा घेतला.
 
आयुर्वेद व्यासपीठच्या पिंपरी चिंचवड शाखेचे कार्यवाह वैद्य शाम जगताप यांच्या चिकित्सालयात प्रातिनिधिक स्वरूपात पोस्ट कोविड क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी उद् घाटन झाल्याची घोषणा करताना उपस्थितांना मार्गदर्शन केले. आयुर्वेद व्यासपीठने कोविड काळात केलेल्या सेवाकार्याचे कौतुक करताना पोस्ट कोविड क्लिनिकच्या प्रत्येक टप्प्यावर प्राधान्याने सहकार्य करण्याचे आणि आयुष टास्क फोर्सव्दारे यास मान्यता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
 
ते पुढे म्हणाले, आयुष आणि एलोपॅथी असा समन्वय ठेवल्यास कोविडसारखा आजार पुढे तीव्रतेने वाढत नाही. इम्युनिटी सेंटरव्दारे रोगप्रतिकारक शक्ति वाढवल्याने कोविड झाला तरी सौम्य स्वरूपातच रहातो. तो उग्र स्वरूप धारण करू शकत नाही. आयुष डाॅक्टरांनी केलेले सर्वच कार्य कोविड नियंत्रणात आणण्यास महत्वाचेच ठरले आहे. कोविड होऊन गेल्यावर होणारे विकार अर्थात पोस्ट कोविडमध्ये श्वसनसंस्थेचे, नाडीसंस्थेचे, ह्रदयरोगासंबंधी, मनोवह स्त्रोताचे अनेक वेगवेगळे आजार निर्माण होतात. कोविड थांबविण्यासाठी व्हॅक्सिनचा जेवढा उपयोग केला जातो तेवढाच आयुषव्दारे पोस्ट कोविड क्लिनिकव्दारे दिलेल्या वैद्यकिय सेवेचाही उपयोग होतो.
 
वैद्य जयंत देवपूजारी यांनीही महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. श्रीधुतपापेश्वर लि.चे कार्यकारी संचालक रणजित पुराणिक यांनी पोस्ट कोविड क्लिनिकच्या या उपक्रमात श्रीधूतपापेश्वर सदैव आयुर्वेद व्यासपीठसोबत राहिल, अशी ग्वाही दिली. आयुर्वेद व्यासपीठाचे केंद्रीय कार्यवाह वैद्य विलास जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्या मृदुला जोशी यांनी केले. वैद्य प्रशांत वाघमारे आणि वैद्य विलोभ भारतीय यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. सर्वांचे सहकार्य आणि केंद्रीय पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे उद् घाटन सोहळा यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमास चांगला प्रतिसादही मिळाला.
 
कोविड १९ हा आजार होऊन गेल्यावरही अनेक गंभीर आजार होऊ शकतात म्हणून लोकांनी आरोग्याचे रक्षण अत्यंत काळजीने करणे आवश्यक आहे. आजच्या काळातील ही सामाजिक आणि वैद्यकिय गरज लक्षात घेऊनच आयुर्वेद व्यासपीठतर्फे महाराष्ट्र, गुजरात,मध्यप्रदेश व गोवा राज्यात पोस्ट कोविड क्लिनिक गुरूवार दि. १० डिसेंबर २०२० पासून सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या क्लिनिकमध्ये अल्पदरात आयुर्वेदिक औषधे, उपचार व आरोग्य मार्गदर्शन सेवाभावी वैद्य देतील. या उपक्रमात वैद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयुर्वेद व्यासपीठतर्फे करण्यात आले आहे.
 
या विषयीची अधिक माहिती आयुर्वेद व्यासपीठाच्या www.ayurvedvyaspeeth.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्यात पोस्ट कोविड विकारासंबंधी आयुर्वेद तज्ज्ञांचे माहितीपर लेख, व्हिडिओ, जिल्हा-जिल्ह्यातील पोस्ट कोविड क्लिनिकच्या माहितीचा समावेश आहे, असे या उपक्रमाच्या प्रमुख वैद्या मृदुला जोशी यांनी सांगितले.