शरदचंद्रजी पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह करणार - रमेश कदम पाटील

जनदूत टिम    08-Dec-2020
Total Views |
किनवट : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थेचा बळी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.
 
Ramesh patil_1  
 
महाराष्ट्रातील जनता होरपळून निघत असुन संवेदना गमावलेल्या राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १२ डिसेंबर रोजी शरदचंद्रजी पवार यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आम्ही एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह करीत आहोत. राजकीय मंडळी आपल्या वाढदिवशी गोरं गरिबांना फळे वाटतात व मोठ्या प्रमाणात फोटो व्हायरल करतात. अशा पद्धतीने आमच्या दारिद्र्याची टिंगल केली जाते आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. असे ते म्हणाले. त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
 
१. संपूर्ण शेतकरी कर्ज मुक्ती, सातबारा कोरा करा.
२. पारदर्शक तथा केंद्रीय पद्धतीने प्राध्यापक व शिक्षक भरती झाली पाहिजे. सी.एच.बी. वर काम करीत असलेल्या प्राध्यापकांना सामावून घेतले गेले पाहिजे.
३. विनाअनुदानित कर्मचाऱ्यांचा पहिल्या दिवसापासून चा १००% पगार देऊन व मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाचे पुनर्वसन राज्य शासनाने करावे.
४. अंगणवाडी कार्यकर्ती व आशाताईं बहिणींना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा, पगार व सुविधा द्या.
५. कंत्राटी कामगारांचे ठेके देण्याची पद्धत तात्काळ बंद करून होत असलेली वेठबिगारी तात्काळ संपवावी. शासनाने कोणत्याही मध्यस्ता शिवाय नेमणूक करावी. “समान काम समान दाम" तत्त्वानुसार पगार व सुविधा द्याव्या.
६. कीड रोग सर्वेक्षक, अंशकालीन कर्मचारी, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, कला शिक्षक यांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल अशी व्यवस्था तात्काळ करावी.
७. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण या संवेदनशील विषयावर घाणेरडे राजकारण बंद करून राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी.
 
या प्रमुख मागण्या व इतर मागण्यांसाठी १२ डिसेंबर २०२० रोजी मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह आयोजित केला असून आपण सर्व बांधवांनी आपल्या घरीच बसून व महात्मा गांधी यांच्या अहिंसा तत्वास अनुसरून सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन द्यावे. असे आवाहन रमेश कदम पाटील यांनी केले आहे.
 
सदरील एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रहात राज्यातील सर्व CHB प्राध्यापक, सेट-नेट धारक, एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, शेतकरी बांधव, बेरोजगार, अंशकालीन कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, सर्व डी.एड. व बी.एड. धारक, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, कीड-रोग सर्वेक्षक, अंशकालीन कर्मचारी, कलाशिक्षक, कंत्राटी कामगार बांधव, दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र, महाराष्ट्र जनता पार्टी, जयहिंद पार्टी, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, भिम आर्मी, गोर सेना व इतर संघटना मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असून आपल्या मनातील प्रचंड रोष व्यक्त करण्यासाठी एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह करीत आहेत. हतबल होऊन अन्नत्याग सत्याग्रहाचे पाऊल उचलणाऱ्या सामान्य माणसाला राज्य शासनाने धीर देऊन शासन संवेदनशील आहे याची जाणीव निर्माण होऊन महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण निर्माण होईल अन्यथा या अन्यायग्रस्त समाजात निर्माण होत असलेली प्रचंड निराशा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आत्महत्या व गुन्हेगारी वाढल्यास आपण व आपले शासन सर्वस्वी जबाबदार असाल असे निवेदनात म्हटले आहे.