एका हाताने दुष्काळ गाडणारा ८० वर्षांचा ढाण्या वाघ

जनदूत टिम    25-Dec-2020
Total Views |
लातूर: लातूरच्या दवणहिप्परग्यात एका हाताचा शेतकरी राहतो. जिद्द, कष्टाच्या जोरावर या बहाद्दरानं १९७२ आणि आजवरच्या तमाम दुष्काळांना दणदणीत पराभूत केलं आहे. ८० वर्षाचा हा शेतकरी एका हातावर ४५ वर्षे शेतातली सगळी कामं करतो. बुलेट, ट्रक, ट्रॅक्टर चार चाकी चालवतो. वाऱ्याच्या वेगानं घोडेस्वारी करतो. स्वत:च्या कष्टावर निव्वळ शेतीतून साम्राज्य उभ्या केलेल्या या शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना आवाहन आहे. आत्महत्येचा विचार जरी मनात आला तर फक्त एकदा माझ्याकडं या, तुमचे विचार गळून पडतील.
 
appa02_1  H x W
 
महादेवअप्पा चिद्रे...अपघातात खांद्यापासून एक हात गमावलाय. पण जिद्दीच्या जोरावर...४५ वर्षाच्या सरावानं, एक हाताने हे काय काय करत नाही, तेही विना अपघात.. बुलेट...चार चाकी..ट्रॅक्टर...घोड्यावर रपेट ही कामं महादेवअप्पा सहज करतात. ८० वर्षाच्या अप्पांना आजही ओव्हर टेक करून कोणीही पुढं गेल्याचं चालत नाही.अप्पांचं गाव लातूर जिल्ह्यातलं देवणी तालुक्यातलं दवणहिप्परगा. कुस्ती खेळताना अप्पांचा हात मोडला. त्या वर्षी ७२ चा तीव्र दुष्काळ होता. अचानक वडील वारले. आई एकटी. घरात पाच बहिणी. डॉक्टरांनी हात खांद्यापासून काढून टाकला. पीढीजात ४० एकर शेतात गवत आणि झाडं-झुडपं होती. अशावेळी अप्पा खचले नाहीत. हातात कुदळ घेतली..एका हाताचे चार हाथ केले..
 
दुष्काळ पराभूत करण्यासाठी हा गडी १९७२ पासून सात वर्षे गावच्या वेशीत शिरला नाही. हात गमावल्याची लाज मनात होतीच. हळूहळू अप्पांनी स्वहस्ते सगळीच्या सगळी जमिन वहिवाटीत आणली. अप्पा शेतीला वळण देत होते. त्या काळात दर तीन-चार वर्षानंतर नापिकी व्हायची. घरची जबाबदारी वाढत होती. पण अप्पांची एकच जिद्द, काहीही झालं तरी शेतं सोडून जायचं नाही. आत्महत्येचा विचारही मनात येवू द्यायचा नाही. ४५ वर्षात अप्पांनी १५० एकर शेती नेली. आपल्या बरोबर सालगड्यालाही १० एकर जमीन घेवून दिली. बुलेट, ट्रॅक्टर, ट्रक, नव-नव्या ब्रँडची चार चाकी वाहने खरेदी केली. कंत्राटाची छोटी-मोठी कामे केली. शेतात देखणा बैलबारदाणा केला. या काळात अप्पांनी एकच पथ्य पाळलं. गावात चकाट्या पिटत बसायचं नाही. राजकारणात सहभाग नको. मित्रांनाही भेटायचं असेल तर शेतावरच्या घरी यायंच.
 
अप्पांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर सगळे दुष्काळ पराभूत केलेत. या वर्षीच्या दुष्काळातही अप्पांना साडेतीनशे पोती तूर..१०० पोती सोयाबीन पिकवलंय. विहिरीच्या थोड्याशा पाण्याचा नेटका वापर करून पाच एकर डाळिंबाची बाग जोपासली आहे.
अप्पांची तीनही मुलं शिकली नाहीत..पण एक नातू इंजिनिअर..एक डॉक्टर आणि शिक्षक झाला आहे. शेती आणि जिवनातल्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी पंचक्रोशीतले लोक महादेवअप्पाच्या घरी येतात. अप्पांनी कहाणी सांगणारी पत्रकं तयार करुन लोकांनी स्वत: पंचक्रोशीत वाटलीत. खचलेल्या शेतकऱ्यांना आप्पा म्हणतात, 'जर का तुम्हाला आत्महत्या करावी वाटली, तशी बुद्धी सुचली, तर मला येवून भेटा, तुमच्या शंकांचं निवारण करतो, अशी माझी खात्री आहे.'
 
अप्पांना राज्य सरकारनं शेती निष्ठ पुरुस्कार दिला आहे. आपल्या अनुभवांवर अधारित अप्पांचा शेतक-यांना संदेश आहे. नापिकीमुळ आत्महत्या होत नाही. अधिर मन अवसानघात करतं, त्यामुळं आत्महत्येचा विचार जरी मनात आला तरी फक्त एकदा या एक हाताच्या माणसाच्या शेतावर या. तुमचे आत्महत्येचे विचार गळून पडतील.