तानसा नदीच्या पुलावरील संरक्षक भिंतीची त्वरीत दुरूस्ती करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे युवक काँग्रेसची मागणी

जनदूत टिम    15-Dec-2020
Total Views |
वसई : वाडा - शहापूर या मार्गावर रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. येथील तानसा - आगळी रोडच्या भावशे गावातील तानसा नदीपात्रावर 7 ते 8 फुटांच्या एकेरी मार्ग असलेल्या रस्त्यावर वाहानांच्या सुरक्षेसाठी एक लोखंडी पूल अर्थात संरक्षक भिंत बांधण्यात आली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला.
 
tansa_1  H x W:
 
एवढया वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत उनपावसाच्या माऱ्यामुळे तसेच देखभाली अभावी लोखंडी पुलाची दुर्दशा होऊन तो गंजून त्याच्या दोन्ही बाजूच्या काही भागातील संरक्षक पट्या तुटल्या आहेत. रस्ता अरूंद असल्याने एका बाजूने चार चाकी वाहन आल्यास समोरून येणाऱ्या दुचाकी वाहान चालकास पुलावरून वाहन बाजूला घेणे शक्य होत नाही. पादचारी सुद्धा अरूंद रस्ता आणि तुटलेला पूल यामुळे बाजूला जाऊन थांबू शकत नाहीत.
 
पूल नादुरूस्त असल्याची सुचना दर्शविणारा कोणताही फलक रस्त्याच्या दुर्तफा लावलेला नसल्याने वाहन चालकांना मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंतीची कल्पना येत नाही. पुलाखालून वाहणारी नदी 50 फूट खोल असल्याने एकाद्या वेळेस चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाल्यास जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष कुलदीप वर्तक काही दिवसांपूर्वी या मार्गावरून चारचाकी वाहनातून जात असताना ही बाब त्यांच्या लक्षात आली व संबंधित धोकादायक पुलाच्या संरक्षक भिंतीची त्वरीत दुरूस्ती होणे आवश्यक असल्याने त्यांनी मा. अशोकराव चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच बॄहन्मुंबई महानगर पालिका यांना दि.14 -12- 2020 रोजी पत्र पाठवून संबंधित पुलाची पहाणी करून त्वरीत दुरूस्तीचे आदेश देण्याची युवक काँग्रेस तर्फे मागणी केली आहे.