माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सरपंचांशी साधला संवाद

जनदूत टिम    15-Dec-2020
Total Views |
ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागाने ‘माझी वसुंधरा’ हे महत्वाकांक्षी अभियान २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ कालावधीकरिता हाती घेतले असून यासाठी ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आलेली आहे. आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात या अभियानाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सरपंच, व ग्रामसेवकांशी संवाद साधला.
 
ZP Thane_1  H x
 
या अभियानातून पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गातील पंचतत्वांचे गुणवत्तापुर्ण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी निवडलेल्या गावात काम करायचे आहे. यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. तरच या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होईल. असे दांगडे म्हणाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी समयोचित मार्गदर्शन केले. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे उपायुक्त व पर्यावरण तज्ञ रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. गेल्या अनेक वर्षांपासून घन कचरा व्यवस्थापनासाठी त्यांनी केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग कसे यशस्वी झाले याची माहिती दिली.
 
कचरा हे उत्पन्नाचे साधन कसे होऊ शकते , यासाठी कशा प्रकारे नियोजन केले पाहिजे याबाबत त्यांनी माहिती दिली. आपण कचरा करायला शिकलो पण त्याचे व्यवस्थापन करणे शिकलो नाही, ते करायला शिकलो तर कचऱ्याची समस्या दूर होईल असेही ते म्हणाले. माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी कशा प्रकारे काम केले पाहिजे याविषयी कोकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार यांनी अभियाना संदर्भात विस्तृत सादरीकरण करून अभियान कशा प्रकारे राबविले जाणार आहे, त्याचे नियोजन कसे असेल याची माहिती दिली.
 
अभियानात करण्यात येणारी कामे
अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे या मुद्यांशी संबंधित कामे केली जातील. तर वायू तत्त्वासाठी प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनार्‍याची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वामध्ये हरित कायद्याचे पालन, पर्यावरण सुधारणा व संरक्षण जनजागृती करण्यावर भर दिला जाईल.
 
अभियानात निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायती ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कल्याण तालुक्यातील म्हारळ, भिवंडी तालुक्यातील खोणी, कोन, कारिवली, काटई, राहनाळ, पिंपळघर, शेलार, काल्हेर, शहापूर तालुक्यातील वासिंद, मोखावणे, आसनगाव, अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, आदि १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १०हजारापेक्षा अधिक लोकसंख्यां असणाऱ्या हा ग्रामपंचायती आहेत. या बैठकीला प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुभास भोर, कार्यकारी अभियंता (बांधकाम ) नितीन पालवे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास संतोष भोसले तसेच भिवंडी गट विकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे, कल्याण गट विकास अधिकारी श्वेता पालवे, अंबरनाथ गट विकास अधिकारी शीतल कदम, शहापूर गट विकास अधिकारी सुशांत पाटील, सहायक गट विकास अधिकारी हणमंतराव दोडके आदी अधिकारी व कर्मचारी तसेच सरपंच , ग्रामसेवक उपस्थित होते.