कुपोषण निर्मूलनासाठी मु.का.अ.यांची कुपोषण मुक्त बीट संकल्पना

जनदूत टिम    15-Dec-2020
Total Views |
पालघर : पालघर जिल्हा मधून कुपोषणाची समस्या नष्ट करून त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करणे महत्त्वाचे असल्याने "कुपोषण मुक्त जिल्हा" अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व कार्यरत पर्यवेक्षिका यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना केल्या.

kuposhan 5874_1 &nbs 
 
पालघर जिल्ह्यामध्ये सर्व तालुका मिळून तेरा प्रकल्प असून १०३ बीट आहेत. प्रत्येक बीट निहाय सरासरी २५ अंगणवाडी केंद्र कार्यरत असून एकूण ३१८३ अंगणवाडी केंद्रे आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्प पालघर मध्ये सॅम व मॅम मुक्त बीटची संख्या ३, मनोर -४, डहाणू-१ वसई १ असे एकूण १ बीट आहेत. परंतु सॅम नसणारी व मॅम श्रेणी मध्ये असणारी बीटची संख्या ३४ इतकी आहे. ५ बालके सॅम श्रेणी मध्ये असणारी बीट ४४ इतकी आहेत .
 
जिल्हा कुपोषणमुक्त करायचा असल्यास सॅम मॅम मुक्त अंगणवाडी केंद्र व सॅम मॅम मुक्त अंगणवाडी प्रभाग राबवण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे. आयसीडीएस व आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी एकत्रितरीत्या समुपदेशन व बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वयंप्रेरणेने कामकाज केल्यास कुपोषण मुक्त होण्यास वेळ लागणार नाही, तसेच त्यामध्ये सातत्य टिकून ठेवावे लागेल. यासाठी दर तीन महिन्यांनी सातत्य टिकवून ठेवणाऱ्या पर्यवेक्षिका व अंगणवाडी कार्यकर्ती यांना जिल्हा परिषदे मार्फत प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून काम करता करता जिल्ह्यातील अनेक कुटुंबे स्थलांतरित होत होत असताना ज्या ठिकाणी स्थलांतरित होतील त्या जवळच्या अंगणवाडी मध्ये बालकांना सुविधा उपलब्ध करून देऊन आरोग्य शिबिरे लावण्याबाबत मु.का.अ. यांनी सूचना दिल्या.
 
'माझी कन्या भाग्यश्री' योजनेअंतर्गत ज्या पालकांनी एक वा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास त्यांना अनुक्रमे रु. पन्नास हजार व रु. पंचवीस हजार देण्यात यावे. अंगणवाडी निहाय पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याकरता जल जीवन मिशन अंतर्गत सर्वांनी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.
 
बाल संगोपन योजनेबाबत जास्तीत जास्त प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर केल्यास एक पालक असणार्‍या किंवा पालक नसणाऱ्या बालकांना त्याचा फायदा घेता येईल असेही मत त्यांनी व्यक्त केले. विविध विभागांशी समन्वय साधून कुपोषण मुक्तीसाठी मु.का.अ. यांचे प्रयत्न सुरू आहेत. या बैठकी वेळी प्रवीण भावसार जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद पालघर हे उपस्थित होते.