घराच्या मेढीचे लाकूड म्हणजे बाबा!' - सीताराम राणे

आशा रणखांबे    14-Dec-2020
Total Views |
कल्याण : अख्या घराचा भार मध्यभागी असणाऱ्या मेढीच्या लाकडावर असतो. त्याप्रमाणे सर्व कुटुंबाच्या मेढीचे लाकूड म्हणजे आपले वडील असतात. असे गौरवोद्गार दि ठाणे डिस्ट्रिक्ट आणि महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी काढले . शारदा प्रकाशन आणि ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लेखिका - कवयित्री प्रज्ञा पंडित यांच्या ' बाबा (संपादित काव्यसंग्रह) , प्रज्ञाक्षरे आणि काव्यलिपी या पुस्तकांच्या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक - दिग्दर्शक विजू माने उपस्थित होते.
 
sitaraman_1  H
 
बाबा, हा केवळ शब्द नसून आयुष्य भारून टाकणारा मंत्र असल्याचे सांगून ठाणे डिस्ट्रिक्ट को - ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे म्हणाले," आजपर्यंत आईचे जितके कौतुक झाले त्यामानाने बाबा दुर्लक्षितच राहिले. आईचे महत्व कोणी ही नाकारणार नाही , पण घराचा आधारस्तंभ म्हणून मेढीचे लाकूड होणाऱ्या बाबांना या काव्यसंग्रहातून कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी न्याय दिला आहे. त्यांनी अनेक कवींना लिहिते केले आहे . या काव्यसंग्रहात महाराष्ट्रातील अनेक कवींच्या कविता आहेत. कवयित्री प्रज्ञा पंडित या काव्यसंग्रहाचा दुसरा भागही प्रकाशित करण्यासाठी कोकण ग्राम विकास मंडळातर्फे जे साह्य लागेल ते नक्की करू. तसेच हे पुस्तक महाराष्ट्रातील रसिकां पर्यंत पोहचेल असा विश्वासही व्यक्त केला.
 
सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक विजू माने म्हणाले की, "स्वतःच्या अखंड परिश्रमातून घराला घरपण देणाऱ्या बाबांचा कवितेतून गौरव करणाऱ्या कवयित्री प्रज्ञा पंडित आणि सर्व कवींचे आपण कायम ऋणी राहू. अखंड परिश्रमाची धगधगती मशाल म्हणजे बाबा"! यावेळी सर्व सहभागी कवींचे कौतुक करताना विजू माने म्हणाले 'बाबा' हा विषय अतिशय हृदयस्पर्शी आहे. आईबद्दल नेहमीच लिहिले-बोलले जाते पण बाबांच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पाठवलेल्या कवितांमधून निवडक कविता निवडून कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी अतिशय कल्पकतेने 'बाबा ' या विषयावरील महाराष्ट्रातील अनेक कवींच्या कवितांचे यशस्वी संपादन केले आहे. व्यक्त होणे यासारखा दुसरा आनंद नाही. हा आनंद या कठीण प्रसंगी या कवींनी दिला आहे. समाजावरील दुःखाचे मळभ घालवायचे असेल तर काव्याक्षरे अधिक प्रमाणात व्यक्त झाली पाहिजेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनिष पंडित यांनी उपस्थितांचे कल्पकतेने स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते तिन्ही पुस्तकांचे अनोख्या पद्धतीने प्रकाशन करण्यात आले.
 
ज्याच्या अमर्याद मेहनतीच्या जोरावर आपले आयुष्य उभे राहते ते म्हणजे आपले बाबा " अशी काव्यमय सुरुवात करून कवयित्री प्रज्ञा पंडित आपल्या मनोगतात म्हणाल्या, जगण्याची जिद्द आणि उमेद ज्यांच्यामुळे वाढते त्या आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात वेगळे स्थान असते. देव्हाऱ्यात देव असतो आणि आपल्या प्रगतीच्या , यशाच्या वाटेवर आपले 'बाबा ' असतात. म्हणूनच या अनेक कवींच्या कवितांतून संघर्षाला साद घालणारे कणखर बाबा आपल्याला भेटतात. शब्दबद्ध होतात. जगणे समृद्ध करणाऱ्या या साहित्यिक प्रवासात एकाचवेळी तीन पुस्तके प्रकाशित होणे हे माझ्या बाबांचेच देणे आहे असे मी मानते.
 
विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती घालवण्यासाठी ' इंग्लिश भाषेचे अतिशय सोपे पुस्तक तसेच आत्मविश्वासावरील अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. 'बाबा' हे ई - पुस्तक कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील रसिकांना मोफत उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व कवींच्यावतीने कवी प्रसाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्याचे शैलीदार सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मनिष पंडित यांनी केले. या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील कवी- लेखक सहभागी झाले होते.