शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावे - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

जनदूत टिम    14-Dec-2020
Total Views |
मुंबई : केंद्र शासनाने ठरविलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये राज्याचा क्रमांक वर यावा यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावेत. पर्यावरणासंदर्भात आजचा विद्यार्थी जागरूक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमार्फत या उद्दिष्टांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत केल्या.
 
nilam gorhe_1  
 
केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये केंद्र शासनाने केलेला कृती कार्यक्रम व राज्य शासनाचा कृती कार्यक्रमासंदर्भात श्रीमती गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.एस. कुंदन उपस्थित होते. तर नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसंकर हे यावेळी व्हिडिओकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीस उपस्थित होते.श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या की, निती आयोगाने शाश्वत विकासाच्या १७ उद्दिष्टानुसार राज्यांचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार राज्यांनीही कृती आराखडे तयार करणे अपेक्षित आहे. शाश्वत विकासासाठी उद्दिष्टे ही व्यापक स्वरुपात आहेत. यानुसार, समाजाच्या तळागाळातील वर्गाला सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे असंघटित महिलांसाठी कृती दशक जाहीर झाले आहे. या सर्वांचा विचार करून शाश्वत विकासामध्ये आपले स्थान कुठे आहे आणि ते आणखी वर आणण्यासाठी काय करायला हवे,याबद्दल सर्वांनीच प्रयत्न करावेत. त्यासाठी लोकप्रतिनिधी व समाजाचे सहकार्य घ्यावे.
 
शाश्वत विकासासाठी कृतीबरोबर आकलनावर भर द्यावा - आदित्य ठाकरे
ठाकरे म्हणाले की, शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठताना कृतीबरोबरच त्या उद्दिष्टांच्या आकलानावर भर देणे आवश्यक आहे. राज्य शासन अनेक निर्णय घेत असते. हे निर्णय कोणत्या ना कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत असतात. मात्र, त्याची वर्गवारी केली जात नसल्यामुळे त्याचा बोध होत नाही. ‌त्यामुळे यापुढील काळात प्रत्येक मंत्रीमंडळ निर्णयामध्ये संबंधित निर्णय कोणत्या उद्दिष्टांशी निगडित आहे, याचा उल्लेख करावा. तसेच सर्व निर्णयांचे उद्दिष्टानुसार एकत्र पुस्तक तयार करावे व युनिसेफ व शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने त्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा.
शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या माहितीबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनाही याबाबत जागरूक करावे. जेणेकरून सर्वांना त्याचे महत्त्व कळेल. त्याचबरोबर अशा विषयांवर चर्चाही व्हावी. तसेच उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी चांगले काम करणाऱ्या विभागाचा गौरव करावा, अशी सूचनाही श्री. ठाकरे यांनी यांनी केल्या.
 
महत्त्वाच्या योजनांचा आराखडा तयार करावा - मुख्य सचिव
मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले की, कृती दशकाच्या अंमलबजावणीसाठी नियोजन करण्यात येत आहे. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक विभागाला जागरूक करण्यात येत आहे. त्यासाठी नवीन योजनांचा संबंध शाश्वत विकास उद्दिष्टांशी कशा प्रकारे आहे, त्याचे मोजमाप काय आहेत,यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. तसेच दरवर्षी प्रत्येक विभागाच्या शाश्वत उद्दिष्टांशी संबंधित अशा पाच महत्त्वाच्या योजना व एक नाविन्यपूर्ण योजनांवर जास्त लक्ष द्यावे. यासंबंधी कृती आराखडा तयार करून त्याच्या अमंलबजावणीवर लक्ष केंद्रीत करता येईल.
 
अपर मुख्य सचिव श्री.देवाशिष चक्रवर्ती यांनी समन्वय विभाग म्हणून शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील सर्वात मागासलेल्या २७ भागांसाठी सूक्ष्म विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच राज्यस्तरावरून राबविण्यात येत असलेल्या १३३५ योजना व जिल्हा वार्षिक योजनेद्वारे राबविण्यात येणाऱ्या ५३६ योजनांचे १७ उद्दिष्टामध्ये वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे. ही माहिती लवकरच नियोजन विभागाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील एक टक्का रक्कम ही सूक्ष्म प्रकल्पांसाठी वापरण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाश्वत उद्दिष्टांनुसार राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय निर्देशकाचे फ्रेमवर्क तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच त्याचे डॅशबोर्ड तयार होईल.
 
यावेळी गगराणी म्हणाले की, वाढते शहरीकरण व त्यानुसार शाश्वत विकासाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी लागणारे नियोजन यासाठी नगर विकास विभागाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. त्यानुसार, जमीनीचा सुयोग्य वापर, हरित जागा उपलब्ध करून देणे, हक्काची घरे मिळण्यासाठी उपाययोजना व सार्वजनिक वाहतुकीवर भर यानुसार कामे सुरू आहेत. श्रीमती म्हैसकर यांनी पर्यावरण व वातावरणीय बदलानुसार करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. माझी वसुंधरा या योजनेद्वारे शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वेणुगोपाल रेड्डी यांनी उद्योग विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या योजनांची तसेच महिला व बाल विकास सचिव श्रीमती कुंदन यांनी महिला व बालविकास विभागामार्फत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डवले यांनी शाश्वत विकास उद्दिष्टातील उपासमारीच्या समूळ उच्चाटनासाठी कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली.
००००