इंधन दरवाढ आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन

जनदूत टिम    13-Dec-2020
Total Views |
कल्याण : दिवसागणित इंधन दरवाढ होत असल्याने महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढ आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसेना कल्याण पूर्व शाखेतर्फे शहरप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले. मात्र मोर्चा आणि आंदोलन करण्यास पोलिसांची परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सुटका केली.
 
domb99874_1  H
 
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु केली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर ताशेरे ओढण्यात आले. कल्याण पूर्व शहर सह संपर्क प्रमुख शरद पाटील यांच्यासह महिला आघाडी, युवा आघाडी आणि सैनिकांची उपस्थिती मोठी होती. “भडकले-भडकले पेट्रोल डीझेलचे भाव भडकले, निघाले-निघाले केंद्र सरकारचे दिवाळे निघाले, शेतकरी आहे सकल जणांचा अन्नदाता तोच खरा देवाचा भाग्य विधाता, रावसाहेब दानावेच करायचं काय खाली डोक वर पाय,अशा घोषणांनी पूर्वेकडील चौकात निदर्शने केली.
 
दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मोर्चेकरी शांत झाले. यावेळी बोडारे म्हणाले,केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डीझेलच्या दरवाढीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.आधीच नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल आणि डीझेलच्या दरवाढीमुळे मुलभूत गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारच्या ध्येय धोरणाचा निषेध करीत करतो. यावेळी घरगुती गॅस महाग झाल्यामुळे महिला सैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.