महा आवास अभियानातून १५८७ कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा

जनदूत टिम    11-Dec-2020
Total Views |

अभियान गतिमान करून घरकुल उद्दिष्टपूर्ती करणार – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे

ठाणे : ग्रामीण भागांतील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात 'महा आवास अभियान ग्रामीण' राबविले जात आहे. ठाणे जिल्हाच्या ग्रामीण भागात देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात असून या अभियान काळात १५८७ कुटुंबाना हक्काचा निवारा मिळणार आहे.

thane024_1  H x 
 
या अभियानाच्या अनुषंगाने मा.मंत्री, ग्रामविकास हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० डिसेंबर २०२० रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने डॉ. दांगडे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांची आढावा सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, घरकुलांच्या उदिदष्टांप्रमाणे १०० टक्के मंजूरी देणे, मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे १०० टक्के वितरण करणे, घरकुलांच्या उदिदष्टांनुसार १०० टक्के घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे, प्रलंबित घरकुल (Delayed Houses) पुर्ण करणे, सर्व घरकुले आर्थिकदृष्टया पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण (Rural Mason Training) पूर्ण करणे, डेमो हाऊसेस (Demo House)उभारणे, कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सिडिंग व आवास प्लस मधील लाभार्थ्यांचे आधार सिडिंग/ जॉब कार्डमॅपिंग १०० टक्के पूर्ण करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम(Convergence) व नावीन्यपूर्ण उपक्रमांची (Innovative / Best Practices) अंमलबजावणी करणे याबाबत तात्काळ कार्यवाही करणेबाबत त्यांनी सुचना दिल्या.  या आढावा सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) चंद्रकांत पवार उपस्थित होते.
 
प्रधानमंत्री आवास योजनेची ८४ टक्के घरकुले पूर्ण
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन २०१६-१७ ते २०२०-२१ मध्ये ठाणे जिल्हयामध्ये ६४८३ घरकुलांना मंजूरी देण्यात आलेली असून त्यापैकी ५४७७ घरकुले पूर्ण झालेले आहेत. ८४ टक्के घरकुले पुर्ण झालेली असून अद्यापही १००६ घरकुले अपुर्ण आहेत. सदर अपुर्ण घरकुले “महा आवास अभियान- ग्रामीण” कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिम जमाती घरकुल योजना व रमाई आवास योजना अंतर्गत ३२६१ घरकुलांना मंजूरी देण्यात आलेली असून त्यापैकी २६८० घरकुले पुर्ण झालेली आहेत. ८२ टक्के घरकुले पुर्ण झालेली असून अद्यापही ५८१ घरकुले अपुर्ण आहेत. सदर अपूर्ण घरकुले “महा आवास अभियान- ग्रामीण” कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
आंतरनियमांचे पालन करून अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सींग च्या माध्यमातून लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करून अभियानाच्या उदिष्टांबाबत, घरकुल बांधकाम व दर्जाबाबत मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच मंजूर घरकुलासाठी कर्ज घेवू इच्छिणा-या लाभार्थ्यांसाठी बँक अधिका-यांच्या उपस्थितीत बँक मेळाव्याचे आयोजन करून लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कर्ज उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.