शरदचंद्र पवार साहेबांचे ८०व्या वाढदिवसानिमित्त ‘व्हर्च्युअल’ सभेतून अभिष्टचिंतन

जनदूत टिम    10-Dec-2020
Total Views |

- ३५८ तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी होणार
- ठामपाच्या १ हजार ६२१ सफाई कामगारांचा कोविड योद्धा पुरस्काराने गौरविणार
- राष्ट्रवादी काँग्रेस राबविणार स्वाभिमान सप्ताह

ठाणे : येत्या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खा. शरदचंद्र पवार साहेब यांचा ८०वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाढदिवसाच्या निमित्ताने मा. शरदचंद्र पवार साहेब हे थेट नागरिकांना भेटणार नसल्याने पक्षाच्या वतीने व्हर्च्युअल अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
paranjpe_1  H x
 
या सोहळ्यात सुमारे ३५८ तालुक्यांमधील सुमारे ४ लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गडकरी रंगायतन येथे या व्हर्च्युअल अभिष्टचिंतनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राज्यभरातून केवळ पाच नेते शरद पवार यांचे अभिष्टचिंतन करणार असून ठाण्यातून हा मान ना. डॉ. जितेंद्र आव्हाडसाहेब यांना मिळाला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांनी दिली.
 
येत्या १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ८०वा वाढदिवस आहे. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा वाढदिवस व्हर्च्युअल पद्धतीने साजरा करण्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या अभिष्टचिंतनाची व्हर्च्युअल सभा आयोजित केली आहे. शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि सुप्रियाताई सुळे हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून या व्हर्च्युअल अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
 
या सोहळ्यामध्ये ठाणे शहरातून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र् आव्हाडसाहेब, नाशिकमधून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळसाहेब, जळगाव येथून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेसाहेब, बीडमधून समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेसाहेब आणि गृहमंत्री अनिल देशमुखसाहेब हे नागपूरमधून हे शरदचंद्र पवार साहेब यांच्या अभिष्टचिंतन व्हर्च्युअल सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. ठाणे शहरातील गडकरी रंगायतनमध्ये ही व्हर्च्युअल सभा होणार आहे. या सभेमध्ये विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई केणी, प्रदेश सरचिटणीस तथा ठामपातील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
 
याच कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवणार्‍या ठाणे महानगर पालिकेच्या १ हजार ६२१ सफाई कामगारांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यापैकी ५ कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात गडकरी रंगायतनमध्ये सन्मानित करण्यात येणार असून १३ ते २० डिसेंबर दरम्यान उर्वरित कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. १२) गडकरी रंगायतन येथेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर, दि. १३ डिसेंबर रोजी कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मा. विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि कौसा-मुंब्रा येथील राष्ट्रवादीच्या विधानसभा कार्यालयात परिवहन सदस्य शमीम खान यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.