वेदांतनगरमधील श्रीदत्तक्षेत्रमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव

जनदूत टिम    30-Nov-2020
Total Views |

तेलाच्या ३००० पणत्यांनी मंदिर परिसर झाला प्रकाशमान

नगर येथील प्रेमदान चौकालगतच्या वेदांतनगरमधील श्रीदत्तक्षेत्रमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात व उत्साहात संपन्न झाला. लाॅकडाऊन नंतर दिवाळी पाडव्यापासून मंदिर खुले करण्याचा आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्यावर हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविक श्रीदत्तक्षेत्रमधील दर्शनास आतुर झालेले दिसून येऊ लागले आहे.
 
nagar 0215_1  H
 
त्रिपुरारी पौर्णिमेस दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा प.पू.श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी सुरू केली. ही परंपरा देवस्थानमधील विश्वस्त मंडळ, कर्मचारी वृंद, सत्संग मंडळ आणि भाविक अशी सर्वांच्या श्रध्दायुक्त सहभागाने जतन केली जात आहे. रविवारी दि.२९ नोव्हेंबर २०२० ला श्रीदत्तक्षेत्रमधील भगवान श्री दत्तात्रेय मंदिरामध्ये नित्याप्रमाणे सायंकाळची आरती ७ वाजता सुरू झाल्यावर काही वेळातच उपस्थित स्त्री-पुरूषांनी दीपप्रज्वलन करण्यास सुरूवात केली. श्रीदत्तक्षेत्रमधील मंदिरासह परिसरात तेलाच्या तीन हजार पणत्यांची आकर्षक पध्दतीने मांडणी करण्यात आली होती.
 
nagar 021558_1  
 
रांगोळ्यांची रेखाटने करताना त्यावर तेलाच्या पणत्यांची मांडणी कलात्मकतेने करण्यात आली होती. स्वस्तिक सारखी मांगल्याची प्रतिके दिव्यांनी तेजोमय होतानाचा क्षण डोळ्यात साठविण्याचा आनंद भाविकांनी घेतला. मंदिरावर विद्युत दिव्यांची आकर्षक पध्दतीने रोषणाईही करण्यात आली होती. श्रीदत्तक्षेत्रमध्ये आरतीचे स्वर निनादत असतानाच मंदिराचा परिसर तेवणा-या पणत्यांच्या सात्विक प्रकाशाने उजळून निघाला. तेवणा-या पणत्यांचा मंद प्रकाश त्या प्रज्वलित करणा-यांना अनामिक समाधान व स्फूर्ती मिळवून देणारा ठरला.
 
कोरोना महामारीचे सावट झुगारून देत अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश या दीपोत्सवाने उपस्थित सर्वांच्या माध्यमामधून दिला. सामाजिक अंतराचे भान ठेवत आवश्यक ती सर्व काळजी घेऊन भाविक दर्शनाचा आनंद घेऊ लागले आहेत. देवस्थानतर्फे भाविकांच्या सुलभ दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.