छोट्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारीमध्ये वाढ

जनदूत टिम    08-Oct-2020
Total Views |
मुंबई : अचानक लावण्यात आलेल्या छोट्या-छोट्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात बेरोजगारीत वाढ झाल्याचे राज्याच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
 
berojgari_1  H
 
जुलैमध्ये ३.९ टक्क्यांवर घसरलेली बेरोजगारी ऑगस्टमध्ये वाढून ६.२ टक्के झाल्याचे वित्त मंत्रालयाने नमूद केले आहे.
सूत्रांनी सांगितले की, राज्याच्या वित्त मंत्रालयाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ मंत्री यांच्यासमोर नुकतेच एक सादरीकरण केले. त्यात ही माहिती देण्यात आली. सादरीकरणात म्हटले की, कोविड-१९ महामारीमुळे एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर प्रचंड वाढून २०.९ टक्क्यांवर गेला होता. मात्र, नंतर सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे जुलैमध्ये तो घसरून ३.९ टक्के झाला. त्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र तो पुन्हा वाढून ६.२ टक्के झाला.
 
वित्त मंत्रालयाने म्हटले की, बेरोजगारीतील वाढीला राज्याच्या अनेक भागात लावण्यात आलेले छोटे-छोटे लॉकडाऊन जबाबदार आहेत. स्थानिक पातळीवरील या लॉकडाऊनमुळे मनरेगा अंतर्गत मिळणारा रोजगार बुडाला. खरिपाच्या पेरणीवरही त्याचा परिणाम झाला. अचानक लावल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळीतील संस्थांचे सामान्य कामकाज ठप्प झाले. छोट्या आणि मध्यम संस्थांना याचा मोठा फटका बसला. सूत्रांनी सांगितले की, छोटे लॉकडाऊन लावण्यास काही मंत्र्यांनी बैठकीत विरोध केला. स्थानिक पातळीवरील लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारनेही राज्यांना सावधान केले आहे.
 
अहवालात म्हटले आहे की, बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये सर्वाधिक २0.९ टक्के होता. त्याआधी मार्चमध्ये तो ५ टक्के होता. मे, जून आणि जुलै या महिन्यांत तो अनुक्रमे १५.५ टक्के, ९.२ टक्के आणि ३.९ टक्के असा घसरत गेला. आॅगस्टमध्ये मात्र तो पुन्हा वाढून ६.२ टक्के झाला.