मला मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी - शिवसेनेचे खासदार संजय जाधव

जनदूत टिम    28-Oct-2020
Total Views |
परभणी : मला मारण्यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचल्याची शक्यता खासदार संजय जाधव यांनी तक्रार अर्जात केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
 
MP-Sanjay-Jadhav-resign_1
 
“मला जीवे मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती हा परभणीतील असावा” असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. माझ्या एका विश्वासू व्यक्तीने मला ही माहिती दिली आहे, असेही संजय जाधव यांनी पोलिसात तक्रार करताना सांगितले. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नानलपेठ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान खासदारांच्या जीवावर उठलेला हा व्यक्ती नेमका कोण? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
 
दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय जाधव यांनी नाराजीतून शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला होता. परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना फोन करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार जाधव नाराज झाले. यातूनच त्यांनी खासदारकीचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले. या पत्रात त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.