नियंत्रित जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई - कैलास पगारे

जनदूत टिम    22-Oct-2020
Total Views |
मुंबई : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात दक्षता पथकाकडून नियंत्रित जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईचे कैलास पगारे यांनी दिली.
 
मुंबई - ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या गैरलाभार्थी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य तसेच गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याकरिता प्रधान कार्यालय तसेच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालय अधिनस्त शिधावाटप कार्यालयांतर्गत एकूण ४४ दक्षता पथके गठीत करण्यात आलेली आहेत.
 
या दक्षता पथकामार्फत लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. अंधेरी विभागात नियंत्रित अन्नधान्याच्या अवैधरित्या वाहतूक प्रकरणी ट्रक क्रमांक एमएच ०४ जीआर ४६९६ मधून गहू १५८.४८ क्विंटल, तांदूळ २६.२५ क्विंटल जप्त करण्यात आला असून एमआय डीसी अंधेरी पालीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र. ६२७/२०२०, गु.प्र.शा.गु.र.क्र.१३२/२०२० दिनांक १०.०९.२०२० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रु.१७,२२,३८८.८७/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
 
दहिसर विभागात विनापरवाना अनधिकृतरित्या अन्नधान्याची साठवणुक व वाहतूक प्रकरणी ट्रक क्रमांक एमएच १० सीआर ४१९७, तांदुळ १६३.५० क्विंटल व गहू ४२४.५० क्विंटल व इतर वस्तू जप्त करण्यात आला असुन एम.एच.बी. पोलीस ठाणे, बोरीवली येथे गु.नो.क्र १७/२०२० दिनांक २३.०९.२०२० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रुपये ३५,८०,७२३/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. भायखळा विभागात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून स्टीलच्या पाईपद्वारे अनधिकृतपणे दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्या प्रकरणी घरगुती वापराचे एकूण ६० सिलेंडर व टेम्पो क्रमांक एमएच ०४ एफपी ७१८२ जप्त करण्यात आला असून भायखळा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र ३७९/२०२०, दिनांक २५.०९.२०२० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रुपये १,४६,६७०/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात
आलेला आहे.
कांजूरमार्ग विभागात नियंत्रित शिधाजिन्नसांचा साठा विनापरवाना साठवणूक व वाहतूक प्रकरणी बोलेरो पिकअप क्र. एमएच 06 बीडब्ल्यु 0523 व ट्रक क्र. एमएच 03 व्हीसी 1233, गहू 103.50 क्विंटल जप्त करण्यात आला असून कांजूरमार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथे वि.स्था.गु.नो.क्र 46/2020 दिनांक 17.10.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रूपये 16,79,794/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. भांडूप विभागातील अधिकृत शिधावाटप दुकान क्रमांक 30 ई 84 दुकानाच्या संपूर्ण तपासणीअंती गहू 34.75 क्विंट्टल चना डाळ 0.90 क्विंट्टलचा अतिरिक्त साठा तसेच तांदूळ 0.68 क्विंटल कमी आढळून आल्या प्रकरणी कांजूर मार्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक 49/2020 दिनांक 20.10.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रूपये 1,02,103/- इतके किंमतीचा अपहार आढळून आलेला आहे.